ठाणे, दि. २० डिसेंबर :
ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. भिवंडीत १४ पैकी १०, शहापूरात ५ पैकी २ ठिकाणी, मुरबाडमध्ये १४ पैकी ८ जागी तर कल्याण तालुक्यातील ९ पैकी ५ ग्रामपंचायतीत भाजपाने यश संपादन केले आहे. भिवंडी तालुक्यातील प्रतिष्ठीत कोनगाव आणि कारिवली ग्रामपंचायतीतही भाजपाचा झेंडा फडकला असून ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे.
ठाणे जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका रविवारी झाल्या होत्या. या ग्रामपंचायतींची मतमोजणी आज सकाळी नऊपासून सुरू झाली. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासूनच भाजपाच्या सरपंचपदाच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. भिवंडी तालुक्यातील १३ पैकी १० ठिकाणी भाजपाचे सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले. तर दोन ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना, तर एका ठिकाणी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला विजय मिळाला. शहापूरमध्ये ५ पैकी २ ग्रामपंचायतीत भाजपाने एकहाती वर्चस्व मिळविले. तर मुरबाडमधील १४ पैकी ८ आणि कल्याणमधील ९ पैकी ५ ठिकाणी भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
प्रतिष्ठीत आणि श्रीमंत कोनगाव ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपाच्या रेखा सदाशिव पाटील…
भिवंडी तालुक्यातील सर्वाधिक प्रतिष्ठीत आणि श्रीमंत कोनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाच्या रेखा सदाशिव पाटील, कारिवलीत संजय परशुराम नाईक, आमणे येथे विश्वपाल रामदास केणे, सापे येथे भाजपाचे गोरखनाथ बारकू सुतार, कोपरमध्ये हेमंत घरत, आवळे विश्वगड येथे प्रिती पवन देसले, खालिंग बु. येथे राजाराम पाटील, दुगाडमध्ये प्रेमा प्रकाश मुकणे, कांबे येथे आरती विजय जाधव आणि अकलोली येथे संचिता म्हसकर यांनी भाजपाचा झेंडा फडकविला.
कल्याणात बाळासाहेबांची शिवसेना – भाजपचं वर्चस्व…
कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालं. इथे एकूण ९ ग्रामपंचायती पैकी बाळासाहेबांची शिवसेनेला ३,भाजप २ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ३ ग्रामपंचायतीवर विजय मिळवला. मात्र इतके वर्षे असणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा कल्याण तालुक्यातील वरचष्मा या निवडणुकीत मोडून निघाल्याचेही दिसून येत आहे.
शहापूरमध्ये ५ पैकी २ ग्रामपंचायती भाजपकडे…
शहापूर तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींपैकी २ ग्रामपंचायतींवर भाजपाने एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, सुभाष हरड यांच्या प्रयत्नाने चिखलगाव आणि बाभळे येथे भाजपाला यश मिळाले.
मुरबाडमध्येही भाजपची आघाडी…
मुरबाडमधील १४ पैकी ८ ग्रामपंचायतीत भाजपाला यश मिळाले. तळेगाव, साकुर्ली, डोंगरन्हावे, मोहघर, कान्होळ, तोंडली, वैशाखरे, मोहघर येथे भाजपाचा झेंडा फडकला.
३ महिन्यांपूर्वीही भिवंडीत भाजपाच अव्वल…
सुमारे तीन महिन्यांपूर्वी भिवंडी तालुक्यात झालेल्या निवडणुकीतही ३१ ग्रामपंचायतींमध्ये भाजपाने सर्वाधिक १२ ग्रामपंचायती जिंकल्या होत्या. तर उद्धव ठाकरे गटाला ८, बाळासाहेबांची शिवसेना, श्रमजीवी आणि मनसेला प्रत्येकी एक, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट व अपक्षांना प्रत्येकी एका जागेवर यश मिळाले होते.
भाजपाच्या उमेदवारांनी दणदणीत यश मिळविल्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागावर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे वर्चस्व असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी भाजपाचे तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे आणि जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील यांनी या निवडणुकीची ही रणनीती आखली होती.