डोंबिवली दि.12 मार्च :
भाजप पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला होऊन १२ दिवस उलटले तरी अद्याप हल्लेखोरांचा तपास लागला नसल्याने भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी शनिवारी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. हल्ला करण्यामागे राजकीय लोकांचा हात असल्याचा आरोप करत या प्रकरणाचा छडा का लागत नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आणि येत्या मंगळवारी पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा आमदार रविंद्र चव्हाण यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिला.
भाजप सोशल मिडीया सेलचे पदाधिकारी मनोज कटके हे आपल्या दुकानात बसलेले असताना दोघा अज्ञात इसमांनी त्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. सध्या कटके यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप हल्लेखोर पकडले न गेल्याबाबत पोलिसांना जाब विचारण्यासाठी शनिवारी भाजप आमदार रविंद्र चव्हाण, कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, मंदार हळबे, विकास म्हात्रे, नंदू जोशी, पूनम पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते रामनगर पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेऊन आमदार चव्हाण यांनी निवदेनही दिले.
त्यानंतर आमदार चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना कटके यांच्या हल्ल्यामागे काही राजकीय लोक असल्याचा आरोप केला. तसेच पोलिसांना माहिती देऊनही त्या दिशेने तपास का होत नाही? असे विचारत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कटके हल्लाप्रकरणात हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केल्याचेही चव्हाण यांनी आठवण करून दिली. तसेच आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी येत्या मंगळवारी रामनगर पोलीस ठाण्यात उपोषणाला बसण्याचा इशाराही आमदार चव्हाण यांनी यावेळी दिला.
दरम्यान या प्रकरणाबाबत प्रसिद्धी माध्यमांनी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांना विचारले असता याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.