Home ठळक बातम्या केडीएमसी प्रभाग रचनेबाबत भाजपचे सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

केडीएमसी प्रभाग रचनेबाबत भाजपचे सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

 

डोंबिवली दि.5 डिसेंबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेतील कलगीतुरा रंगण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरून कल्याण जिल्हा भाजपने शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून निवडणूक गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप केला आहे. कल्याण जिल्हा भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

केडीएमसी निवडणुकीच्या प्रभाग रचनेसाठी सत्ताधाऱ्यांनी खासगी एजन्सी नियुक्त केल्याचे सांगत प्रभाग रचनेची माहिती सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे उपलब्ध असल्याचा गंभीर आरोप कांबळे यांनी यावेळी केला. या बदलणाऱ्या वॉर्डची रचना त्यांच्या कार्यकर्त्यांकडे अगोदरच कशी काय उपलब्ध आहे? तसेच त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचे सांगत कोणाच्या तरी सांगण्यावरून वॉर्ड रचना केली जात आहे. ते केवळ भाजपला अडचणीत आणण्यासाठी आणि भाजपचे नगरसेवक कमी करण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा आरोपही शशिकांत कांबळे यांनी यावेळी केला. हे सर्व लोकशाहीला मारक कृत्य असून सर्व पक्ष आणि संस्थांना सोबत घेऊन वॉर्ड रचना करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

तर सत्ताधाऱ्यांच्या या कृत्यांविरोधात आम्ही लोकशाही आणि न्यायालयीन मार्गाने लढा देऊ आणि त्यांना नक्कीच धडा शिकवू असा इशाराही कांबळे यांनी यावेळी दिला. दरम्यान भाजपने केलेल्या या सर्व आरोपांवर आता सत्ताधारी पक्षांकडून काय प्रतिक्रिया दिली जाते ते लवकरच स्पष्ट होईल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा