पोलीस कार्यालयावर मोर्चा काढून भाजप विचारणार जाब
कल्याण डोंबिवली दि.25 जानेवारी :
आगामी केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील भाजप नगरसेवकांना टार्गेट करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप भाजपने महाविकास आघाडीवर केला आहे. तसेच येत्या शनिवारी शासन आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी येत्या शनिवारी अपर पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चाही काढण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक येत्या 2-3 महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आपली ताकद वाढविण्यासाठी आणि भाजप नगरसेवक-पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पोलिसांच्या माध्यमातून दबाव आणत असल्याचा आरोप भाजप नेते नरेंद्र पवार यांनी यावेळी केला. तर सचिन खेमा, मनोज राय, कुणाल पाटील या भाजपच्या नगरसेवकांवर गेल्या काही दिवसांत दाखल झालेले गुन्हे खोटे असून महाविकास आघाडी सरकारतर्फे त्यांना जाणीवपूर्वक अडकवण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही पवार यांनी यावेळी केला.
याचाच जाब विचारण्यासाठी भाजपतर्फे भाजप आमदार आणि सरचिटणीस रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती नरेंद्र पवार यांनी दिली. त्यामध्ये भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असून या मोर्चाद्वारे महाविकास आघाडी सरकार आणि पोलीस प्रशासनाला जाब विचारण्यात येणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत भाजपचे शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, माजी नगरसेवक अर्जुन भोईर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.