डोंबिवली दि.24 जून :
नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव देण्याची मनसेची भूमिका कायम असून भूमीपुत्रांचा आवाज आपण यापुढेही उठवत राहू अशी भूमिका मनसे आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज नवी मुंबईत सिडकोला घेराव घालण्यात येणार आहे. त्यासाठी आमदार पाटील आणि शेकडो कार्यकर्ते रवाना झाले.
आजच्या आंदोलनात आपण सहभागी होणार नाही असं कोणीही बोललं नव्हतं. राज ठाकरे यांनी केवळ तांत्रिक बाब उपस्थित केला होता. या विमानतळाचे कोणतेही नाव अद्याप अंतिम झाले नसेल तर दि.बा.पाटील यांचेच नाव देण्याची आमची भूमिका आजही कायम असल्याचे आमदार राजू पाटील म्हणाले. तर याप्रकरणी भाजपने एवढ्या तांगड्यात न ठेवता आपली भूमिका स्पष्ट केली पाहीजे होती. मात्र आम्ही यापूढेही भूमीपुत्रांचा आवाज उठवत राहणार आणि आताही त्याचसाठी जात असल्याचे आमदार राजू पाटील म्हणाले.
दरम्यान सिडकोच्या घेराव आंदोलनाला जाण्यासाठी अनेक कार्यकर्ते आमदार पाटील यांच्या निवासस्थानी सकाळपासून जमले होते. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत ठिक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.