खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली जागेची पाहणी
कल्याण दि. 9 एप्रिल :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्याण पूर्वेतील प्रस्तावित स्मारकाचे येत्या मंगळवारी 12 एप्रिल रोजी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमीपूजन केले जाणार आहे. हे स्मारक म्हणजे एक उर्जेचे आणि शक्तीचे प्रतिक ठरेल अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली. बाबासाहेबांच्या या प्रस्तावित स्मारकाच्या जागेची खासदार डॉ. शिंदे यांनी शिवसेना पदाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासह आज पाहणी केली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
खासदार शिंदे यांनी केलेल्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे अनेक कायदेशीर, तांत्रिक आणि इतर अडचणी पार करत या स्मारकाच्या भूमीपूजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वात महत्वाची आणि तांत्रिक बाब असणाऱ्या स्मारकासाठी आवश्यक जागेचे आरक्षण खुप कमी वेळेत बदलण्यात आले असून नगरविकास विभागाच्या माध्यमातून त्यासाठी निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कल्याण पूर्वेतील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी होती. मात्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याची संकल्पना मांडत त्यादृष्टीने वेगाने प्रक्रिया सुरू केली. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठ पुरवठ्यामुळे ३ नोव्हेंबर २०२१ रोजी दीपावलीच्या पूर्वसंध्येला नगर विकास विभागाने इथल्या १३०० चौरस मीटर जागेचे आरक्षण बदलण्याचा शासन निर्णय जाहीर केला. आरक्षण बदलाची ही प्रक्रिया विक्रमी वेळेत पार पडली. यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री शिंदे यांनी जातीने लक्ष दिले असून येत्या मंगळवारी त्याचे उद्घाटन होत असल्याने आनंद व्यक्त होत आहे.
बाबासाहेबांचे स्मारक ठरणार उर्जेचे प्रतिक – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
या स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा असणार आहे. तसेच इथल्या प्रेक्षागृहात बाबासाहेबांचा जीवनपट उलगडणारी तैलचित्रे कायमस्वरुपी ठेवण्यात येतील. तर बाबासाहेबांवर आतापर्यंत लिहिण्यात आलेल्या पुस्तकांचे ग्रंथालयही यामध्ये असेल. जेणेकरून बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हे स्मारक उर्जेचे, ताकदीचे प्रतिक ठरेल असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.