Home ठळक बातम्या भिवंडी-कल्याण मेट्रोच्या कामाला लवकरच सुरुवात होणार – महायुतीचे उमेदवार कपिल पाटील

भिवंडी-कल्याण मेट्रोच्या कामाला लवकरच सुरुवात होणार – महायुतीचे उमेदवार कपिल पाटील

नरेंद्र मोदी मोदींच्या सभेला 1 लाख नागरिकांची उपस्थिती

कल्याण दि.13 मे :
भिवंडी-कल्याण मेट्रोच्या कामाच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) अंतिम मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच निविदा काढली जाईल. त्यानंतर भिवंडी-कल्याण मेट्रोच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. येत्या बुधवारी कल्याणात होणाऱ्या या जाहीर सभेला 1 लाखांच्या आसपास नागरिक उपस्थित राहतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.(Loksabha elections – Bhiwandi-Kalyan Metro work will start soon – Mahayuti candidate Kapil Patil)

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पाच्या कामाची निविदा काढण्यात आली. मात्र राज्यात सरकार बदलल्यामुळे मेट्रोच्या मार्गाबाबत वाद निर्माण केला गेला. त्यानंतर ठराविक समाजासाठी मेट्रोचा मार्ग बदलण्याचा घाट घातला गेला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात मेट्रोचे काम झाले नाही. परंतु आता लवकरच मेट्रोची निविदा निघून कामाला सुरुवात होईल, असेही कपिल पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के रक्कमेची हमी देणारे पत्र दिले गेले नाही. त्यामुळे मुरबाड रेल्वेचे काम रखडले, असा आरोपही श्री. कपिल पाटील यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला एक लाख नागरिक उपस्थित राहणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १५ मे रोजी कल्याणमध्ये होणाऱ्या सभेला एक लाख नागरिक उपस्थित राहतील. या सभेद्वारे भिवंडी, कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात मोदीमय वातावरण निर्माण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमूख उपस्थितीत आधारवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर १५ मे रोजी दुपारी अडीच वाजता ही जाहीर सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सातत्याने महायुतीला जनतेचे समर्थन मिळत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होणारी सभा विक्रमी होईल. तसेच भिवंडी, कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही उमेदवारांचा विजय होईल असे कपिल पाटील यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशाचा विकास होत असून, त्यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जनतेने भरघोस मतदान करावे. सध्या उन्हाची तीव्रता असली, तरी देशासाठी मतदान करण्यासाठी एक दिवस द्यावा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन कपिल पाटील यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, शहराध्यक्ष वरुण पाटील, प्रेमनाथ म्हात्रे आदींची उपस्थिती होती.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा