भिवंडी दि.5 जून :
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभेमध्ये एक मोठा उलटफेर झालेला पाहायला मिळाला. याठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी प्रतिस्पर्धी दिग्गज उमेदवार आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पराभव केला.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय मतदानाची आकडेवारी समोर आली असून भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम या दोन्ही मतदारसंघांनी सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांच्या विजयाची भक्कम पायाभरणी केल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
केंद्रीय मंत्री आणि सलग दोन वेळेचे खासदार राहिलेल्या महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्यामुळे भिवंडी लोकसभेच्या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. त्यातच मतदानाच्या दहा दिवस आधी कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती. या पार्श्वभुमीवर कपिल पाटील यांच्या विजयाचा अंदाज व्यक्त होत असतानाच सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी अतिशय जोरदार लढत देत हे सर्व अंदाज खोटे ठरवले. आणि ठाणे जिल्ह्यातील महायुतीच्या एका प्रमुख मतदारसंघात थेट केंद्रीय मंत्र्याचा पराभव करत म्हात्रे हे जायंट किलर म्हणून भिवंडी लोकसभेतून निवडून आले.
मतमोजणीच्या सुरुवातीच्या पहिल्या दोन कलांमध्येच केवळ कपिल पाटील यांना आघाडी मिळाली होती. मात्र त्यानंतर हळूहळू महाविकास आघाडीच्या सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी पाटील यांना धोबीपछाड देत शेवटच्या फेरीपर्यंत आपली मतांची आघाडी कायम राखली. तर सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांच्या विजयात सर्वात मोठा वाटा भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम या दोन विधानसभा मतदारसंघांनी उचलला. या दोन्ही ठिकाणी म्हात्रे यांना 1 लाखांहून अधिक मताधिक्य मिळाले. तर त्याखालोखाल मुरबाड, भिवंडी ग्रामीण, कल्याण पश्चिम आणि शहापूर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक लागतो.
तर कपिल पाटील यांना कल्याण पश्चिम (1 लाख 5 हजार 365) मुरबाड (1 लाख 6 हजार 369) विधानसभा मतदारसंघ, भिवंडी ग्रामीण (83 हजार 402) वगळता उर्वरित तिनही विधानसभा मतदारसंघात 43 हजार ते 47 हजारापर्यंतच इतकी कमी मते मिळाली आहेत. उलटपक्षी सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांच्यासाठी भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम या दोन्ही विधानसभा मतदारसंघांनी विजयाचा पाया रचला . तर उर्वरित चार विधानसभा मतदारसंघांनी त्यावर कळस चढविण्याचे काम केले.
LNN सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांची विधानसभानिहाय मते..LNN
-
LNN
- भिवंडी पूर्व – 1 लाख 8 हजार 113
- भिवंडी पश्चिम – 1 लाख 8 हजार 358
- मुरबाड – 77 हजार 568
- भिवंडी ग्रामीण – 75 हजार 330
- कल्याण पश्चिम – 74 हजार 129
- शहापूर – 54 हजार 701
LNN