महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या “रोड शो”ला तुफान प्रतिसाद
कल्याण दि.10 नोव्हेंबर :
महायुतीचा प्रचार हा अत्यंत जोरामध्ये सुरू असून लाडक्या बहिणी या सर्व महायुतीसोबत उभ्या आहेत. त्यामुळे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासह महायुतीचे राज्यातील सर्व उमेदवार बहुमताने निवडून येणार असल्याचा विश्वास कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी कल्याणात व्यक्त केला. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी निघालेल्या भव्य रोड शोमध्ये खा.डॉ. शिंदेही सहभागी झाले होते. त्यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. (Beloved sisters, along with the Mahayuti, all candidates of the Mahayuti along with Kalyan Paschim will be elected by majority – MP Dr. Srikant Shinde)
विश्वनाथ भोईर मोठ्या मताधिक्याने पुन्हा निवडून येणार…
कल्याण पश्चिममधून विश्वनाथ भोईर यांच्या प्रचार फेरीला लोकांचा अत्यंत मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार विश्वनाथ भोईर यांच्या माध्यमातून मतदारसंघात चांगले काम झालेले आहे. तसेच मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणून विविध योजना आणि विकासकामे करण्यात ते यशस्वी झाले असून विश्वनाथ भोईर हे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी खात्री खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात जे विकासकाम केले आहे ते पाहता लोकच महायुतीची प्रत्येक जागा निवडून आणतील असेही खा. डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले.
तर विरोधकांना आता पराभव समोर दिसू लागला आहे, लाडक्या बहिणी बाहेर येऊन या निवडणुकीत महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणणार आहे. याला घाबरून विरोधकांनी सुरुवातीला ज्या योजनेला सर्वाधिक विरोध केला ,सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करू असे सांगणारे आज आपल्या घोषणापत्रात 3 हजार रुपयांचे आश्वासन देत आहेत. हा किती मोठा विरोधाभास असल्याचे सांगत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
दरम्यान कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी आज अतिशय भव्य अशा रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते आणि सुमारे दोन हजारच्या आसपास बाईकस्वार कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रत्येक चौकाचौकात या प्रचार फेरीचे पुष्पवृष्टी आणि फटाक्यांच्या गजरात स्वागत करण्यात येत होते. दुर्गाडी चौकातून निघालेली ही रॅली आधारवाडी, खाडकपाडा, बिर्ला कॉलेज, भवानी चौक, सिंडीकेट, रामबाग 0 नंबर, पुष्पराज हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जुन्या कल्याणातील टिळक चौक, पारनाका मार्गे लालचौकी येथील आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके मैदानात संपन्न झाली.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, शहरप्रमुख रवी पाटील, भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, विधानसभा संघटक छायाताई वाघमारे, आर पी आय जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, विधानसभा संघटक मयूर पाटील, माजी नगरसेवक संजय पाटील, दुर्योधन पाटील, जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, गणेश जाधव यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे प्रमूख नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.