कल्याण डोंबिवली दि.4 नोव्हेंबर :
दिवाळी झाल्या झाल्या लगेचच विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवलीमध्ये आज एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे येत आहेत. (Battle in Balekilla: Today Chief Minister Eknath Shinde in Kalyan and Raj Thackeray in Dombivli)
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार असलेल्या विश्वनाथ भोईर यांना सलग दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. भोईर यांचे मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालय कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात उभारण्यात आले आहे. या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी 7 वाजता होणार आहे. त्यामुळे एकप्रकारे कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक प्रचाराचा नारळ यानिमित्ताने फुटणार आहे.
तर दुसरीकडे मनसेचे एकमेव आमदार असणाऱ्या राजू पाटील यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज डोंबिवलीत येत आहेत. डोंबिवलीच्या पी अँड टी कॉलनी येथे सायंकाळी 5 वाजता त्यांची जाहीर सभा होत असून मनसेच्या ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रचाराचा शुभारंभ या सभेच्या माध्यमातून होणार आहे. या आपल्या पहिल्याच जाहीर सभेत राज ठाकरे यांची तोफ कोणकोणत्या विरोधकांवर धडाडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान कालच म्हणजेच रविवारी दिवाळी सण संपला आणि आता आजपासून विधानसभा निवडणुकीचे राजकीय फटाके फुटणार आहेत. पुढील दोन आठवडे हा राजकीय रणसंग्राम चालणार असून यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडलेल्या पाहायला मिळणार आहेत.