मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाचा पुढाकार
अंबरनाथ दि.१३ जून :
ग्रामीण भागातील युवा वर्गाला रोजगाराच्या अधिकाधिक संधी प्राप्त होण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून अंबरनाथ तालुक्यात मूलभूत इलेक्ट्रिकल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार किसन कथोरे यांच्या प्रमूख उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
रोजगाराच्या संधी तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी कौशल्य विकास आधारित कार्यक्रमांवर केंद्र आणि राज्य सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाने राज्याच्या वेगवेगळ्या भागात हे कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर कर्जत रोडवर असणाऱ्या कासगाव जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मूलभूत इलेक्ट्रिकल प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवा वर्गाला नक्कीच रोजगाराच्या अधिकाधिक संधी प्राप्त होतील असा विश्वास यावेळी उद्घाटक आमदार किसन कथोरे यांनी यावेळी व्यक्त केला. तर देशातील युवा वर्गामध्ये कौशल्य विकास करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. देशातील युवा वर्गाला या कार्यक्रमांच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प हा खारीचा वाटा उचलत असल्याची प्रतिक्रिया मुंबई ऊर्जा मार्गच्या सत्येंद्र माकन यांनी दिली आहे.
यावेळी झालेल्या उद्घाटन समारंभाला माजी पंचायत समिती सभापती बाळाराम कामरी, कासगांवच्या सरपंच कामरी ताई, कुळगांव पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक दिपक भोई यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.