कल्याण दि. 23 फेब्रुवारी :
एकीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही कोवीडचे नियम पायदळी तुडवणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरोधात आता पोलीसही आक्रमक झाले आहेत. कल्याणच्या सर्वाधिक गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात विनामास्क फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर बाजरपेठ पोलिसांनी कारवाई केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे मास्क न घालणाऱ्या बेजबाबदार व्यक्तींमध्ये सामान्य नागरिकांबरोबरच उच्च शिक्षित उच्चभ्रू लोकांचाही समावेश असल्याचे दिसून आले.
गेल्या आठवड्याभरात कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर महापालिका प्रशासन सतर्क झाले असून त्यांनीही कोवीडचे नियम न पाळणाऱ्या व्यावसायिक, दुकानदारांवर कारवाई सुरू केली आहे. तर आता महापालिका प्रशासनापाठोपाठ पोलीस यंत्रणेनेही कंबर कसलेली दिसत आहे. कल्याणातील सर्वात गर्दीच्या आणि गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाजारपेठ पोलिसांनी आज कारवाई केली. विनामास्क फिरणाऱ्या अनेक बेजबाबदार नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत पुन्हा विनामास्क आढळल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.
दरम्यान यावेळी सामान्य नागरिकांसह अनेक उच्चशिक्षित व्यक्तीही बेजबाबदारपणे विनामास्क असल्याचे आढळून आले. तर रिक्षाचालक, बसचालक, वाहनचालक यांच्यासह काही महिलाही विनामास्क असल्याचे आढळून आल्या. तर कोरोनाला दूर ठेवण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक असून नागरिकानी त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांनी एलएनएनशी बोलताना सांगितले.