कल्याण दि.5 मार्च :
कल्याण पश्चिम हादरवून सोडणाऱ्या वृद्ध महिलेच्या निर्घृण हत्येचा उलगडा करण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. घटगाडीवरील कंत्राटी कर्मचाऱ्याने कर्जबाजारीपणापोटी दागिने आणि पैसे चोरण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या महिन्यात 27 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास हा भयानक प्रकार घडला होता. कल्याण पश्चिमेच्या दत्तआळी परिसरात एकट्याच राहणाऱ्या हंसाबेन प्रविणभाई ठक्कर या 70 वर्षीय वृद्ध महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्येच्या या घटनेने कल्याण पश्चिमेत एकदम खळबळ उडाली होती. हंसाबेन यांची हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणामुळे झाली या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे आणि आरोपीला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान बाजारपेठ पोलिसांसमोर होते. मात्र कोणताही धागादोरा नसताना बाजारपेठ पोलिसांनी आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावत या गुन्ह्याचा छडा लावला.
कल्याण पश्चिमेच्या वाडेघर भागात राहणारा वासू उर्फ विजेंद्र कृष्णा ठाकरे हा 35 वर्षीय इसम घंटागाडीवर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता. तसेच संध्याकाळी तो पारनाका परिसरात पावभाजीची गाडीही लावायचा. ज्यातून त्याची आणि हंसाबेन ठक्कर यांच्याशी ओळख झाली होती. तर कर्जबाजारी झाल्याने त्याला मोठ्या प्रमाणात पैशांची गरज होती. आणि हंसाबेन या घरात एकट्याच असल्याने त्यांच्याकडे चोरी करणे सोयीस्कर ठरेल या लालसेपोटी त्याने हंसाबेन यांच्यावर सतत पाळत ठेवून घराची रेकी केल्याची माहितीही अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली. गेल्या शनिवारी घराच्या मागील बाजूला असलेला कचरा उचलण्यासाठी हंसाबेन यांनी वासूला सांगितले. हीच संधी साधत वासू त्यांच्या घरात घुसला आणि चोरीच्या उद्देशाने हंसाबेन यांची हत्या केली. मात्र त्यांच्या घरात काहीच न सापडल्याने रिकाम्या हातानेच त्याला तिथून पळ काढावा लागल्याचेही पोलीस तपासात समोर आले.
या गुन्ह्याचा तपास कल्याणचे डीसीपी विवेक पानसरे, एसीपी अनिल पोवार, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यशवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे आणि त्यांच्या पथकाने केला आणि आरोपीला गजाआड करण्यात यश मिळवले.