भाजपच्या ८ वर्षांतील धोरणां विरोधात जनजागृती
डोंबिवली दि.९ ऑगस्ट :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशभरात ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान ” भारत जोडो अभियान” राबवले जात असून ठिकठिकाणी “आझादी गौरव पदयात्रा” काढल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वात डोंबिवलीमध्येही या आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
डोंबिवली पश्चिम येथून या काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेला सुरुवात झाली. डोंबिवलीतून सुरू झालेली ही पदयात्रा संपूर्ण कल्याण डोंबिवली ते मोहने टिटवाळा अशी तब्बल 82 किलोमीटर चालणार आहे. 12 ऑगस्ट रोजी कल्याण पूर्व, 13 ऑगस्ट रोजी कल्याण पश्चिम आणि 14 ऑगस्ट 2022 रोजी मोहने टिटवाळा अशी ही यात्रा फिरणार आहे. या पदयात्रेत काँग्रेसच्या माध्यमातून ७५ वर्षामध्ये देशाने केलेली प्रगती, काँग्रेस नेत्यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर देशासाठी केलेले बलिदान तसेच इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचे सांगत गेल्या 8 वर्षात भाजपने केलेल्या चुकीच्या निर्णयाबाबत जनजागृती करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले.