
डोंबिवली दि.28 मार्च :
कल्याण – शिळ रोडवर असणाऱ्या ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडून त्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका उच्चशिक्षित व्यक्तीला मानपाडा पोलिसांनी रंगेहाथ पकडत बेड्या ठोकल्या आहेत. राहुल चोरडीया वय 35 वर्षे असे या व्यक्तीचे नाव असून तो मध्यप्रदेशातील इंदोरचा रहिवासी असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चोरीसारख्या घटनाना आळा घालण्यासाठी पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांना रविवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास ॲक्सिस बँकेचे शटर बंद दिसले आणि आतून ड्रिल मशीनचा आवाज त्यांना ऐकू आला. याबाबत पोलिसांना संशय आल्याने त्यांनी एटीएमचे शटर ठोठावले. त्यानंतर ड्रिल मशीनचा आवाज बंद झाल्याने आतमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आणखी बळावला. पोलिसांनी अतिशय सतर्कपणे एटीएमचे शटर उघडले असता, आत असणाऱ्या व्यक्तीने त्यांना धक्का मारुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला पळण्यास वाव न देता शिताफीने पकडून त्याची झडती घेतली. त्याच्याकडील काळ्या रंगाच्या बॅगेत एटीएम फोडण्यासाठी लागणारे ड्रिल मशीनसह इतर साहित्य आढळून आले. एटीएम मशिन तोडून त्यातील पैसे चोरण्याचा आपण प्रयत्न केल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती शेखर बागडे यांनी दिली.
या प्रकरणी राहुल चोरडीयावर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ड्रील मशीन, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, कटावणी, होल्डर पिन, एमसील असे साहित्य हस्तगत केले आहे. त्याचे एम कॉमपर्यंत शिक्षण झाले असून तो इंदोरमधील एसआयएससीओ (SISCO) नामांकित कंपनीमध्ये काम करत होता. ही कंपनी एटीएम मशीनमध्ये कॅश भरण्याचे काम करते. त्यामुळे राहुलने आणखी काही एटीएममधून अशा प्रकारे चोरी केल्याचा संशय असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब पवार यांच्या मार्गर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सर्जेराव पाटील, पोलीस हवालदार राजेंद्र खिलारे, विजय कोळी, पोलीस नाईक दीपक घाडगे, भारत कांदळकर, प्रविण किनरे, महादेव पवार, यल्लपा पाटील, महेंद्र मंझा, पोलीस कॉन्स्टेबल तिडके यांच्या पथकाने केली.