
डोंबिवली दि.23 फेब्रुवारी :
बंगल्याच्या आवारातील बागेत काम करणाऱ्या एका 80 वर्षाच्या वृद्ध महिलेचे मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केल्याची घटना डोंबिवली एमआयडीसीच्या मिलापनगर परिसरात घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सुहासिनी परांजपे असे या 80 वर्षीय वृद्धेचे नाव आहे. सुहासिनी परांजपे आणि त्यांचे पती शरदचंद्र परांजपे 85 वर्षे हे आपल्या बंगल्याचा आवारात बागकाम करीत होते. त्यावेळी स्कूटरवरून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने काही वेळ त्यांच्या घरासमोर येऊन पाहणी केली. त्यानंतर बंगल्याच्या कंपाऊंडचे गेट उघडून आत प्रवेश करत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला आजींंनी विरोध केला असता चोरट्याने आजींना ढकलून देत तिथून धूम ठोकली. हा सर्व प्रकार सुरू असताना त्यांचे पती शरदचंद्र परांजपे यांनी या चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा चोरटा स्कूटरवरून पळून जाण्यात यशस्वी ठरला. या घटनेत सुदैवाने वृध्द महिलेला थोडीशी दुखापत झाली आहे. हा सर्व प्रकार शेजारील बंगल्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.