डोंबिवली दि.31 जानेवारी :
कोरोना काळात उल्लेखनीय काम करत अनेक लोकांचे जीव वाचवणाऱ्या डोंबिवलीच्या आरआर रुग्णालयातील डॉक्टरांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कोवीड काळात उत्कृष्ट सेवा, अथक परिश्रम आणि निस्वार्थ सेवा दिल्याबद्दल आरआर रुग्णालयाचे डॉ.अमीर कुरेशी आणि डॉ. भरत तिवारी यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोवीडच्या लाटेमध्ये अनेक रुग्णांचे जीव वाचवणारे रुग्णालय म्हणून आरआर हॉस्पिटलची ख्याती आहे. डोंबिवलीतील पहिले कोवीड आयसीयु हॉस्पिटल म्हणूनही रुग्णालयाची ओळख आहे. कोवीड काळात कोरोना रुग्ण बरे करण्याचा या रुग्णालयाने जवळपास ९३% रिकव्हरी रेट कायम राखला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हॉस्पिटलचे डॉ.अमीर कुरेशी आणि डॉ. भरत तिवारी यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आणि परिश्रम संस्थेच्या वतीने कोरोना योद्धा सन्मान करण्यात आला.
यापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल आरआर रुग्णालयाला सन्मानित करण्यात आले आहे. कोरोना काळात अनेक पोलीस, पत्रकार, शासकीय कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षातील पुढाऱ्यांवर या रुग्णालयात यशस्वी उपचार झाले आहेत. केवळ कोवीडच नव्हे तर इतर आजारांवरही या रुग्णालयात उपचार केले जातात.