अध्यात्मिक परंपरेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश
कल्याण दि.17 जुलै :
आज असलेल्या आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला आहे. येथील बिर्ला कॉलेजने काढलेल्या ज्ञानदिंडीच्या माध्यमातून संपूर्ण कल्याण नगरी विठूनामाच्या गजरात दुमदुमून गेलेली पाहायला मिळाली तर आपल्या अध्यात्मिक परंपरेच्या माध्यमातून बिर्ला कॉलेजच्या या दिंडीने पर्यावरण रक्षणाचा संदेशही दिला.
आषाढी एकादशीनिमित्त कल्याणातील अग्रगण्य बिर्ला कॉलेजतर्फे दरवर्षी या दिंडीचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये बिर्ला महाविद्यालयातील आणि बिर्ला शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांसह वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेत असतो. आजच्या आषाढी एकादशीनिमित्त निघालेल्या या दिंडीतही हेच चित्र दिसून आले विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम या वारकऱ्यांच्या लाडक्या ओव्यांसोबतच पर्यावरण रक्षणाचे संदेशही या ज्ञान दिंडीतून देण्यात आले. झाडे लावा झाडे वाचवा पाणी वाचवा यासारखे सामाजिक संदेश देत या ज्ञानदिंडीतील सहभागी विद्यार्थ्यांनी सामाजिक जनजागृती करण्याचा सुंदर असा प्रयत्न केला.
तत्पूर्वी बिर्ला बिर्ला महाविद्यालयातून पारंपारिक रिवाजानुसार ही ज्ञानदिंडी शहाडच्या विठ्ठल मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाली. यामध्ये कल्याणचे प्रांताधिकारी विश्वास गुजर, आमदार कुमार आयलानी, सेंचुरी रेऑन कंपनीचे पांडे सर,बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, नाईट कॉलेजचे प्राचार्य हरीश दुबे, काँग्रेसचे आर.बी.सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी या ज्ञानदिंडीमध्ये सहभागी झाली होती. पारंपारिक वेशामध्ये आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या ज्ञानदिंडीने कल्याणकरांची मनं जिंकली.