केडीएमसी, पर्यावरण दक्षता मंडळ आणि निर्मल युथ फाऊंडेशनचा उपक्रम
डोंबिवली दि.30 सप्टेंबर :
नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवामध्ये राबवण्यात आलेल्या निर्माल्य संकलन मोहीममेद्वारे तब्बल 21 हजार किलोहून अधिक निर्माल्य गोळा करण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माल्य नदी आणि खाडीमध्ये जाण्यापासून रोखले गेल्याने पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. (As many as 21 thousand kilos of Nirmalya were collected through the Nirmalya collection campaign)
२० विसर्जन स्थळांवर ४२५ स्वयंसेवकांची उपस्थिती…
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पर्यावरण दक्षता मंडळ, डोंबिवली आणि निर्मल युथ फौंडेशन डोंबिवलीच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली आणि टिटवाळा येथील 20 विसर्जन स्थळांवर ही निर्माल्य संकलन मोहीम हाती घेण्यात आली होती. डोंबिवली आणि टिटवाळा येथील एकूण २० ठिकाणी ४२५ स्वयंसेवकांच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात आला.
डोंबिवलीत याठिकाणी झाले संकलन…
डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली गणेश घाट, कुंभारखाण पाडा, सातपुल जेट्टी, रेतीबंदर गणेश घाट, कोपर तलाव तसेच डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव तलाव, भोईर वाडी तलाव, नानासाहेब धर्माधिकारी बाग (कृत्रिम तलाव), प्रगती कॉलेज (कृत्रिम तलाव) ह्या स्थळांवर निर्मल युथ फौंडेशन संस्थेच्या अनेक कार्यकर्त्यांनी सेवाकार्य केले. तर डोंबिवली पूर्वेतील मिलापनगर कृत्रिम तलाव, शिवम हॉस्पिटल कृत्रिम तलाव, टिळकनगर शाळा कृत्रिम तलाव, नेहरू मैदान कृत्रिम तलाव, म्हसोबा चौक कृत्रिम तलाव, चोळेगाव तलाव, पंचायत बावडी तलाव येथे मॉडेल , मंजुनाथ आणि पटेल कॉलेज (ठाकुर्ली) येथील विद्यार्थींनी सेवाकार्य बजावले.
टिटवाळ्यात याठिकाणी झाला उपक्रम…
तसेच काळू नदी गणेश घाट, वासुंद्री गाव, गणेश घाट मांडा टिटवाळा तसेच गणेश घाट रुंदे या टिटवाळा येथील विसर्जन स्थळांवर जीवनदीप महाविद्यालय, गोवेली आणि स्थानिक स्वयंसेवकांनी सेवाकार्य केले.
या निर्माल्याचे बनणार खत…
या सर्व २० ठिकाणी अंदाजे २१ हजर ४९६ किलो निर्माल्य हे ७ हजार ९५० किलो सुक्या कच-यापासून विलग करून शास्त्रीय विल्हेवाटीसाठी केडीएमसीकडे सुपूर्द करण्यात आले. डोंबिवलीतील निर्माल्य श्री गणेश मंदिर संस्थानच्या डोंबिवलीस्थित खत प्रकल्पाला महानगरपालिकेमार्फत पाठवण्यात आले आहे. ह्या उपक्रमामुळे स्थानिक जलस्त्रोत निर्माल्यासह येणा-या प्लॅस्टिकच्या प्रदूषणापासून आपण सर्वांच्या मदतीने वाचवू शकलो अशा शब्दांत पर्यावरण दक्षता मंडळातर्फे समाधान व्यक्त करण्यात आले.