कल्याण दि.25 फेब्रुवारी :
एकीकडे कोवीडविरोधात महापालिका पुन्हा एकदा सज्ज झाली असतानाच दुसरीकडे कर थकबाकीदारांविरोधातही प्रशासकीय यंत्रणा आक्रमक झाली आहे. तब्बल 1 कोटी 18 लाखांहून अधिक कर थकवल्याविरोधात केडीएमसीने कल्याण पश्चिमेतील व्हीएलसीसी या नामांकित ब्युटी पार्लर सील केले आहे. कर निर्धारक विनय कुलकर्णी यांच्या आदेशावरून कर अधीक्षक प्रमोद पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
थकीत करदात्यांना दिलासा देण्यासाठी काही महिन्यांपूर्वी केडीएमसी प्रशासनाकडून ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली होती. ज्याचा लाभ अनेक लहान मोठ्या थकबाकीदारांनी घेतल्याचे दिसून आले. तर महापालिका प्रशासनाकडून थकीत कराचा भरणा करणेबाबत या नामांकित ब्युटी पार्लरला वारंवार स्मरणपत्र, नोटीसही बजावण्यात आली. परंतु या पार्लर व्यवस्थापनाकडून महापालिकेच्या या पत्रांवर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामूळे आज दुपारी ‘ब प्रभाग क्षेत्र’ कार्यालयातील कर अधीक्षक प्रमोद पाटील यांच्या पथकाने हे ब्युटी पार्लर सील केले. तब्बल 1 कोटींपेक्षा अधिकचा कर थकवल्याप्रकरणी केडीएमसीकडून करण्यात आलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे.