ठाणे दि.17 ऑगस्ट :
मुलांना मोकळे सोडा, मुलांशी वाद झाला तरी चालेल, पण संवाद पाहिजे. मुलांवर शिस्तीचा ताण नको, पालक हा मुलांचा दोस्त पाहिजे. पालकांनी आपल्या आकांक्षा त्यांच्यावर लादू नये, असे प्रांजळ मत ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या अर्थशास्त्राच्या माजी प्राध्यापिका मेघना मेहेंदळे यांनी व्यक्त केले. प्रा. मेहेंदळे यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या सोहळ्यात त्या बोलत होत्या. ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ असलेल्या दादा कोंडके सभागृहात हा सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला होता.
देशात सध्या मुलांसाठी वातावरण चांगले नाही. अशावेळी त्यांच्या मनात कोणत्याही गोष्टीची भीती न घालता मुठी वळवत लढण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. स्त्रीची ताकद खूप मोठी असते. ती एकाचवेळी विविध रूपात आपल्याला भेटत असते. त्यामुळे स्त्रीचा सन्मान करण्याची शिकवण प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला दिली पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
तर ज्ञानसाधना महाविद्यालय ही आम्हा शिक्षकासाठी प्रयोगशाळा आहे, होती. जुने, माजी विद्यार्थी वयाने वाढले आहेत, पण त्यांचे चेहरे तसेच आहेत. वय जसे वाढत चालले तसे महाविद्यालयाची आणि माजी विद्यार्थी यांची आठवण येते. ज्ञानसाधना महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य शाम फडके. त्यांनी सुरुवातीला एक दांडगा वर्ग मला दिला. त्या वर्गाला तू बदलून दाखव. वर्षाच्या शेवटी यातून चांगले काही निर्माण कर, असे सांगितले. एकदा त्या वर्गात गेले. एक मुलगा पान खाऊन आला. तो नेहमी पान खाऊन वर्गात यायचा अशी माहिती मला मिळाली होती. त्याच्याशी संवाद साधताना, जवळ पानाचे दुकान कुठे आहे. मलाही दररोज एक पान घेऊन ये आपण खाऊ असे सांगितले. माझे अनपेक्षित बोलणे त्याच्या मनावर परिणाम करणारे ठरले आणि त्याने पान खाऊन वर्गात येणे बंद केले, अशी आठवण मेहेंदळे यांनी यावेळी सांगितली.
सोहळ्याच्या आधी सीमा कोंडे आणि महेंद्र कोंडे यांनी तयार केलेली मेघना मेहेंदळे यांचा जीवनपट उलगडून दाखवणारी चित्रफीत दाखवण्यात आली. मानपत्राचे वाचन मकरंद जोशी याने केले. यावेळी मोहनीश कळसकर, सुनीता कदम-सूर्यवंशी यांनी मराठी, हिन्दी गीते सादर करून कार्यक्रमात बहर आणला. अत्यंत कमी वेळात सिमा कोंडे, प्रीती मानकामे- पाटील, महेंद्र म्हस्के, महेंद्र कोंडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय तरे उपस्थित होते.