केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाली नियुक्ती
कल्याण दि.17 ऑक्टोबर :
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून कल्याण जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष पदांपाठोपाठ युवा मोर्चाची नवी कार्यकारिणीही जाहीर केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी वैभव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्ताने कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र असलेल्या वैभव यांच्या राजकारणातील अधिकृत कारकिर्दीला सुरुवात झाली आहे.
कल्याण पश्चिमेत झालेल्या दिमाखदार सोहळ्यात केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते वैभव गायकवाड यांना हे जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड, जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण पश्चिम शहराध्यक्ष वरुण पाटील, सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांनी दाखवलेला विश्वास आणि पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर सोपवलेल्या जबाबदारीला न्याय देण्यासाठी आपण शंभर टक्के प्रामाणिक प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया वैभव गायकवाड यांनी नियुक्तीनंतर व्यक्त केली आहे.
दरम्यान वैभव गायकवाड यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर कल्याण पूर्वेतील युवा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केल्याचे दिसून आले. वैभव गायकवाड यांचे जंगी स्वागत करून वाजत गाजत फटाके फोडून युवा कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा केला.