कल्याण-डोंबिवली दि. 27 एप्रिल :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात कोणतीही दुर्घटना होवू नये म्हणून काळजी घेणे आवश्यक असून यासाठी फायर, इलेक्ट्रिक आणि ऑक्सिजन पुरवठयाचे ऑडिट करण्यासाठी शासनमान्य तज्ञ संस्थेची नेमणूक करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले. (
रुग्णालयातील रुग्णांना आवश्यक असलेले रेमिडीसिविर इंजेक्शन योग्य प्रमाणात दिले जात नाही याची पाहणी करण्यासाठी दक्षता पथक नेमण्याचे निर्देशही पालकमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले. रेमडीसीवीरबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असून जास्त कोटा रिलीज झाला की ही समस्या सुटेल असा दिलासा पालकमंत्र्यानी यावेळी दिला. रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाची सद्यस्थिती कळत नाही त्यामुळे प्रत्येक रुग्णाची माहिती दिली जाणे आवश्यक असल्याचे मतही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
तर कोविडबाधित रुग्णाला बेड मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते, त्या कालावधीत त्याचे सॅच्युरेशन कमी होते, अशा रुग्णांस तातडीने ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना या बैठकीत केली. यासाठी महानगरपालिकेने मोठया प्रमाणात ऑक्सिजन कॉनसंट्रेटरची मागणी करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
महानगरपालिकांकडून मागणी घेवून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हा खर्च करता येईल अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. शहापूर, मुरबाडसारख्या ग्रामीण भागातही ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यासाठी ऑक्सिजन कॉनसंट्रेटर द्यावेत अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी या बैठकीत केली.
तर आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्वेत ऑक्सिजन प्लांट तयार करण्यासाठी रु 1कोटींचा आमदार निधी देत असल्याची माहिती यावेळी दिली.
ग्रामीण कोरोनावाढीस इतर राज्यातून येणा-या स्थलांतरीत नागरिकांचा मुद्दा आमदार राजू पाटील यांनी उपस्थित करत या नागरिकांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले.
रेमिडिसिविरचा वापर, ऑक्सिजन पुरवठयाचे नियमन करण्यासाठी पालिकेतर्फे भरारी पथकाची नेमणूक – डॉ. विजय सूर्यवंशी
खासगी रुग्णालयांची दोन वेळा बैठक घेवून त्यांना ऑडिट करुन घेणेबाबत स्पष्ट सुचना दिल्या आहेत आणि ऑक्सिजन पुरवठयाच्या नियमनासाठी त्रयस्थ पक्षिय लेखा परिक्षणाची नेमणूक केल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. रुग्णालयातील 50 ते 60 टक्के ऑक्सिजन शिल्लक असेपर्यंत त्याची आगाऊ सुचना देणे आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री यांनी यावेळी मांडले असता काही रुग्णालये क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल करुन घेतात आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो अशी माहिती आयुक्तांनी दिली. तसेच रेमिडिसिविरचा वापर, ऑक्सिजन पुरवठयाचे नियमन करण्यासाठी पालिकेतर्फे भरारी पथकाची नेमणूक केल्याचेही पालिका आयुक्तांनी सांगितले. त्याचप्रमाणे 30 हजार रेमिडिसिवरची मागणी पुरवठादारांकडे केल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिकेच्या कोविड रुग्णालयांत हेल्पडेस्क तयार केले असून त्याद्वारे माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना दिली जाते, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
तर 1 मे पासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी सुरु होणा-या लसीकरणासाठी 10 प्रभागात 10 सेंटरची व्यवस्था करण्यात येत असून प्रती सेंटर 500 नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. नविन सेंटरसाठी एसओपी तयार करण्यात आली असल्याची माहितीही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.