
कल्याण दि.8 मार्च :
“हो किसी के लिए मखमली बिस्तरा..और किसी के लिए इक चटाई भी न हो”. या कवितेच्या ओळींमधूनच समाजातील असमानतेचे भीषण वास्तव प्रतीत होते. या ओळी आठवण्याचे कारणही तसेच काहीसे खास आहे. जागतिक महिला दिनानिमित्त कल्याण डोंबिवलीमध्ये आज वेगवेगळे सोहळे साजरे होत असताना अनुबंध सामाजिक संस्थेने राबवलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे. (Anubadh Sanstha celebrated a unique Women’s Day honoring hardworking women)
कोणताही दिवस असो की कोणताही सोहळा, समाजातील कष्टकरी वर्गासाठी सगळेच दिवस सारखेच. कोणताही दिवस असला म्हणजे काही त्यांचा रोजच्या जीवनातील संघर्ष ना कमी होणार आणि नाही कधी संपू शकेल. कष्टकरी वर्गातील अशाच काही धडाडीच्या आणि कोणत्याही परिस्थितीला हसत मुखाने तोंड देणाऱ्या महिलांसोबत अनुबंध सामाजिक संस्थेने आजचा जागतिक महिला दिन साजरा करत कुटुंबासाठी त्या घेत असलेल्या मेहनत आणि जिद्दीला सलाम केला. उन्हातान्हात, पावसापाण्यात कोणत्याही काळात या कष्टकरी महिलांची जगण्याची संघर्षयात्रा चालूच असते.
अनुबंध संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कल्याण शहर परिसरातील या कष्टकरी महिलांशी संवाद साधला आणि गुलाबाचे फूल देत त्यांच्या जिद्दीला सलाम केला. कल्याणमधील सिध्दार्थनगर, कातरवाडी, वायले नगर, बिर्ला कॉलेज परिसरातील आदिवासी वाडी, बारावे गाव, आधारवाडी परिसरातील महिलांबरोबर अनुबंध संस्थेच्या कार्यकर्त्यांनी संवाद साधला. मनीषा यादव,मंगी बसावे, अरुणा वाघे, भीमाबाई वाघे, सावित्री वाघे , सुमन मौर्य, लक्ष्मी जयस्वाल आदि महिलांनी यावेळी त्यांचा रोजचा जगण्याचा संघर्ष कथन केला. अपुरे उत्पन्न, घरदार नाही, नीट डॉक्युमेंट्स नाहीत,घर नाही ,अशाही काळात त्यांची जगण्याची उमेद टिकून आहे, मुलांच्या शिक्षणासाठी धडपड सुरूच आहे. या कष्टकरी महिलांच्या जिद्दीला सॅल्यूट.
अनुबंध संस्थेचे सूर्यकांत कोळी, विशाल जाधव, विशाल कुंटे,दशरथ साबळे,सबुरी पांचाळ,रवी घुले यांनी हा अनोखा उपक्रम राबवला.