मेडीकल दुकानाचा परवाना मंजूर करण्यासाठी स्विकारली लाच
कल्याण दि.9 जुलै :
मेडीकल दुकानाचा परवाना मंजूर करण्यासाठी तब्बल 70 हजारांची लाच घेताना ठाणे अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफ डी ए) औषध निरिक्षकासह खासगी व्यक्तीला नवी मुंबई अँटी करपप्शन विभागाने रंगेहाथ पकडले. कल्याण पश्चिमेतील डी मार्टसमोर सापळा रचून
नवी मुंबई अँटी करपप्शन विभागाने सोमवारी संध्याकाळी ही कारवाई केली.(Anti-corruption caught a private person along with an inspector of Thane FDA in Kalyan while accepting a bribe of 70 thousand.)
संदीप नारायण नरवणे असे या ठाणे एफडीएच्या औषध निरीक्षकाचे नाव असून सुनिल बाळू चौधरी असे खासगी व्यक्तीचे नाव आहे. नविन मेडीकल दुकानाचा परवाना मंजूर करण्यासाठी शासकीय फी व्यतिरिक्त स्वतःसाठी 1 लाख रुपयांच्या रकमेची मागणी संबंधित व्यावसायिकाकडे केली होती. मात्र तडजोडीनंतर 70 हजार रुपये घेण्यावर सहमती झाली.
दरम्यान संबंधित व्यावसायिकाने याप्रकरणी नवी मुंबई अँटी करपप्शन विभागाकडे तक्रार दाखल केली. त्याआधारे अँटी करपप्शन विभगाने कल्याण पश्चिमेत सापळा रचून संदीप नरवणे याच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून 70 हजार रुपये स्विकारताना सुनिल चौधरीला पकडले. याप्रकरणी नवी मुंबई अँटी करपप्शन विभागाने दिलेल्या तक्रारीवरून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 च्या कलम 7,7 (अ),12 प्रमाणे कल्याणातील महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.