डोंबिवली, दि.8 सप्टेंबर :
कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी बुधवारचा दिवस चांगलाच संस्मरणीय असा ठरला. एकीकडे कोरोना काळातही केडीएमसी प्रशासनाने केलेल्या उल्लेखनीय कामांचे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून कौतूक होत असताना दुसरीकडे त्याच प्रशासनातील प्रभारी कनिष्ठ अभियंत्याला अँटी करप्शनने 4 हजारांची लाचप्रकरणी पकडले. त्यामूळे केडीएमसी प्रशासनातील लाचखोरी आणि खाबूगिरीचा मुद्दा काही केल्या थांबायचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात पाणी पुरवठा विभागात काम करणाऱ्या सुनील वाळंज या प्रभारी कनिष्ठ अभियंत्याने नव्या नळजोडणीची वर्कऑर्डर काढण्यासाठी ही 4 हजारांची लाच मागितली होती. बुधवारी दुपारी तक्रारदाराने या अभियंत्याशी फोनवरून संपर्क साधला असता हे पैसे खासगी लायसन्स प्लंबर रवींद्र डायरेकडे देण्यास सांगितले. त्यानूसार अँटी करप्शनने सापळा रचत डायरेला कनिष्ठ अभियंता वाळंजसाठी पैसे घेताना पकडले. तर ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नंतर कनिष्ठ अभियंता सुनील वाळंज आणि डायरे या दोघांनाही ताब्यात घेत पुढील चौकशी सुरु केली आहे.
दरम्यान एकीकडे कोरोना काळात केडीएमसी आयुक्तांकडून झालेल्या विकासकामांबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेले प्रशासनाचे कौतूक आणि त्याच प्रशासनातील अभियंत्यावर लाचखोरी प्रकरणी झालेली कारवाई. हे दोन्ही विरोधाभासी चित्र काल पाहायला मिळाले.