भारतीय नौदलाशी झाला ऐतिहासिक सामंजस्य करार
कल्याण दि. 4 नोव्हेंबर :
छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण खाडी किनारी उभारलेल्या स्वराज्याच्या पहिल्या आरमाराचा पराक्रमी इतिहास सदैव तेवत राहण्याच्या उद्देशाने स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत कल्याण खाडी किनारी नौदल संग्रहालय (Naval Museum) उभारण्यात येत आहे. या नौदल संग्रहालयाचे आणखी एक पाऊल पुढे पडले असून भारतीय नौदलाच्या ताफ्यातील टी – 80 (Indian Naval Fast Attack Craft -IN FAC T 80) युद्धनौका स्मारक स्वरूपात कल्याणच्या खाडी किनारी विराजमान होणार आहे. यासंदर्भात गुरुवारी भारतीय नौदल आणि स्मार्ट कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशन (SKDCL) यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची संकल्पना उतरतेय प्रत्यक्षात…
छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ल्याच्या खाडीकिनारी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या पहिल्या आरमाराला यंदा 356 वर्षे पूर्ण झाली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी कल्याणच्या खाडी किनारी पहिल्या मराठा आरमाराची स्थापना करत शत्रूला चांगलीच जरब बसवली. हा पराक्रम पुढील पिढ्यांनाही कायम प्रेरणा देत राहण्याच्या उद्देशाने कल्याण खाडीकिनारी नौदल संग्रहालयाच्या रुपात हा पुरातन वारसा जपण्याची संकल्पना कल्याणचे तत्कालीन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मांडली आणि त्यादृष्टीने ताबडतोब प्रयत्नही सुरू केले. खाडी किनारी कल्याणच्या प्राचीन इतिहास आणि नाविक वारशाला साजेसं एक पर्यटनस्थळ निर्माण झाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचे जतन होण्यासह शहराचाही नावलौकिक वाढीस लागेल हा त्यांचा उद्देश. डॉ. विजय सुर्यवंशी यांच्यानंतर या प्रकल्पाची धुरा नवनिर्वाचित आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे आली आणि त्यांनीही तितक्याच उत्साहाने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जोमाने काम सुरू केले आहे.
नौदल संग्रहालयासाठी नौदल अधिकारी आणि अभ्यासकांच्या सक्रिय सहभागाची जोड…
या नौदल संग्रहालयामध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत झालेला समृद्ध सागरी इतिहास, भारतीय नौदलाच्या अनेक प्रेरणादायी घटना चित्रे, शिल्पे, कलाकृतींचे प्रदर्शन मल्टिमिडीयाच्या स्वरूपात मांडले जाणार आहे. विशेष म्हणजे या संग्रहालयाचे स्वरूप आणि उद्देश एकसंध राहावे म्हणून प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून भारतीय नौदल अधिकारी आणि अभ्यासकांच्या सक्रिय सहभागाची जोड त्याला लाभली आहे. भारतीय नौदल आणि SKDCL यांच्यातील सहकार्यामध्ये विविध टप्प्यांमध्ये अभ्यास दौरे, अभिलेखीय ऐतिहासिक सामग्रीची देवाणघेवाण आणि त्यापाठोपाठ आता दस्तुरखुद्द T-80 युद्धनौकाच स्मारक म्हणून इकडे आणली जाणार आहे.
टी 80 युद्धनोकेने दोन दशकांहून अधिक काळ केलीय देशसेवा…
इंडियन नेव्हल फास्ट अटॅक क्राफ्ट (FAC T-80) या श्रेणीतील ही युद्धनौका २४ जून १९९८ रोजी भारतीय नौदलात कार्यान्वित झाली होती. तब्बल 23 वर्षे या युद्धनोकेने देशसेवा करीत अनेक महत्वाच्या ऑपरेशन्समध्ये सहभाग घेतला. विशेषतः उथळ पाण्याच्या ऑपरेशनसाठी तयार करण्यात आली होती आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सुरक्षा प्रदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गस्त घालण्यात ही युद्धनौका कायम तत्पर राहिली. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ही युद्धनौका नौदलाच्या ताफ्यातून सेवा निवृत्त करण्यात आली असली तरी ती नौदलात ती आजही धाडसाचे आणि पराक्रमाचे प्रतिक म्हणून वेगळी ओळख आहे.
समृद्ध नौदल वारशाच्या इतिहासाशी कायमस्वरुपी संबंध जोडला जाणार…
दरम्यान भारतीय नौदलासोबत करण्यात आलेल्या या सामंजस्य करारासाठी भारतीय नौदलाचे मुख्यालय महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे अधिकारी कमोडोर जिलेट कोशी, कमांडर अभिषेक कारभारी, कॅप्टन पी के मन्ना, लेफ्टनंट अरुण कुमार, लेफ्टनंट सोम प्रकाश आणि लेफ्टनंट अर्जुन पंडित यांनी प्रतिनिधित्व केले. तर स्मार्ट सिटी प्रकल्पातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, कार्यकारी अभियंता तरुण जूनेजा आणि हेरिटेज व्यवस्थापन सल्लागार सचिन सावंत यांनी प्रतिनिधित्व केले. या सामंजस्य करारामुळे भारतीय नौदलाचा कल्याण-डोंबिवलीशी आणि महाराष्ट्राच्या समृद्ध नौदल वारशाच्या इतिहासाशी कायमस्वरुपी संबंध जोडला जाईल.