महारोजगार मेळाव्यात एकाच वेळी २ हजार हजारांहून अधिक जणांना मिळाल्या नोकऱ्या
कल्याण दि.१८ डिसेंबर :
आज एक वेगळे चित्र राज्यात दिसत असून एकीकडे लोकांना वेठीला धरून मोर्चा निघत आहे आणि दुसरीकडे आपण या मेळाव्याच्या माध्यमातून लोकांना रोजगार देण्याचं काम करत असल्याचे सांगत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या मोर्च्यावर भाष्य केले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभागाच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पुर्वेत पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना खासदार शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतानाच विद्यमान राज्य सरकारतर्फे सुरू असणाऱ्या आणि पूर्ण केलेल्या विकासकामांची माहिती दिली. कालच्या महरोजगार मेळाव्याला साडे ५ हजार तरुण तरुणींनी हजेरी लावली. ज्यापैकी तब्बल २ हजार १५२ जणांना थेट नियुक्तीपत्रे देण्यात आली.
यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
हे सरकार अतिशय गतीमानतेने विकासकाम करत आहे…
मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेअंतर्गत ३५ कोटीपेक्षा जास्त निधीचे वितरण विविध माध्यमातून केले गेले आहे. त्यातून अनेक नवीन उद्योजक तयार होणार असून ७५० हुन अधिक उद्योजकांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने धर्मवीर आनंद दिघे कल्याण कार्यक्रम योजनेअंतर्ग ५ हजार लाभार्थी पात्र ठरले असून त्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णयही घेतल्याचे त्यांनी सांगितले. तर संजय गांधी निराधार योजनेंतर्गत १ हजार ७०० लाभार्थी पात्र असून त्यांना महिन्याला एक हजार अनुदान दिले जाणार असल्याचे सांगत गेली अडीच वर्षे सरकारला आराम होता. मात्र आता मंत्रायलयात गाऱ्हाणे ऐकली जात आहेत, सोडवली जात असून हे सरकार अतिशय गतीमानतेने विकासकाम करत असल्याचेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.
या मेळाव्यात ठाणे जिल्ह्यातील विविध शहरातून साडे ५ हजारांहून अधिक तरुण – तरुणींनी हजेरी लावली. यामध्ये १ हजार १०० जणांनी ऑनलाइन तर मेळाव्याच्या ठिकाणी २ हजार ६३१ नोंदणी केली. यावेळी २ हजार १५२ जणांना थेट नियुक्तीपत्रे देण्यात आली. आर्थिक महामंडळ स्वयंरोजगार संस्थेच्या काउंटरवर ४ हजार ६६७ नोंदणी करण्यात आल्या.
स्वयंरोजगारासाठी विविध महामंडळांचा सहभाग…
मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांच्या स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी झाली होती. यामध्ये अण्णाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास आदींच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. याव्दारे विविध योजनांची माहिती आणि मार्गदर्शन करण्यात आले. याचबरोबर विविध शासकीय – खासगी क्षेत्रातील बँकांचाही यामध्ये समावेश होता. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राज्यात राबविण्यात येत असलेल्या प्रशिक्षण योजनांची माहितीही यावेळी देण्यात आली .