
कल्याण दि.2 ऑगस्ट :
आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आपल्या संस्कृतीत मोठे महत्त्व आहे. ही अमावस्या दिप अमावस्या म्हणून आपल्याकडे साजरी केली जाते. येत्या रविवारी असलेल्या या दिप अमावस्येचे निमित्त साधून कल्याणातील सुप्रसिद्ध बालक मंदिर संस्थेच्या शालेय विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व असा दिपोत्सव साजरा केला. ज्यामध्ये संस्थेच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळेतील पूर्व प्राथमिक ते पाचवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी या सुंदर अशा सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी झाले होते.
बालक मंदिर संस्थेच्या सभागृहातील प्रांगणात झालेल्या दिपोत्सवात शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरून आणलेल्या विविध आकाराच्या,नाविन्यपूर्ण बहुरंगी पणत्या आणि दिव्यांच्या माध्यमातून भव्य अशी आरास करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेविका वंदना गीध यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचे स्थान असून घरातील इडा पिडा टळावी, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या भावनेतून यावेळी दिव्यांचे मनोभावे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या शाळा समुहातील शाळांमधील सुमारे १ हजार ५०० विद्यार्थी आणि त्यांचे पालकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा महिंद्रकर आणि पाहुण्यांची ओळख सुबोध कुलकर्णी यांनी करून दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या जोशी, प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका प्रतिभा मोरे, ओक हायस्कूलचे मुख्याध्यापक दिलीप तडवी सर, इंग्रजी पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मारिया मॅडम , प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा ठाकरे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन इंगोले यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले .