कल्याण दि.17 जुलै :
कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या महत्त्वाकांक्षी रिंग रोडच्या आठ टप्प्यांपैकी टप्पा चार ते सात (दुर्गाडी ब्रिज ते एसएच ३५-४० रोड जंक्शन) अशा चार टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तर उर्वरित टप्प्यांचे कामही जलदगतीने पूर्ण करण्यासह प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादनदेखील जलदगतीने करण्याच्या सूचना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएच्या बैठकीत दिल्या.(Ambitious Ring Road : 4 phases of the project completed; Dr. Shrikant Shinde reviewed)
कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण भागाच्या वाहतुकीला अधिक गती प्राप्त करून देणारा कल्याण रिंग रोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प अंतिम टप्प्यात येत आहे. या मार्गाच्या उभारणीनंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतुकीला एक नवा आयाम प्राप्त होणार आहे.
या प्रकल्पाच्या सद्यस्थितिचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी, कल्याण डोंबिवली महानरपालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना खासदार डॉ.शिंदे यांनी दिल्या.
कल्याण रिंग रोड प्रकल्पाची उभारणी प्रगतीपथावर
– प्रकल्पाची आठ टप्प्यांमध्ये उभारणी
– टप्पा – ४ (दुर्गाडी ब्रिज ते गांधारे ब्रिज), टप्पा – ५ (गांधारी ब्रिज ते मांडा जंक्शन), टप्पा – ६ (मांडा जंक्शन ते टिटवाळा जंक्शन), टप्पा – ७ (टिटवाळा जंक्शन ते एसएच ३५-४० रोड जंक्शन) या टप्प्यांचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे.
– टप्पा – ३ (मोठा गाव ब्रिज ते गोविंदवाडी रोड) या रस्त्याचे कामही प्रगतीपथावर असून २०२६ पर्यंत ते पूर्ण करण्यात येणार आहे.
– टप्पा – १ (हेदुटणे ते शिळ रोड) आणि टप्पा – २ (शीळ रोड ते मोठागाव ब्रीज) या मार्गाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन करून हे देखील काम २०२६ पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे.
प्रकल्पाचे फायदे :
– काटई – टिटवाळा हे एक तासाचे अंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांवर येणार.
– अवजड वाहनांची वाहतूक देखील या मार्गावरून होणार असून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर भार येणार नाही.
– शहरांतर्गत वाहतुकीला गती मिळेल.
– या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर शहरी आणि ग्रामीण भागातील वाहतूक सेवा अधिक सोयीची आणि गतिमान होणार.