अपर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या मुलाखतीने शुभारंभ
कल्याण दि.25 जानेवारी :
कैद्यांमधील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी आणि त्यांना एक विरंगुळा म्हणून कल्याण जिल्हा कारागृहातही (आधारवाडी जेल) जेल प्रशासनातर्फे मुंबई परिसर विपश्यना केंद्राच्या सहकार्याने एफएम रेडिओ केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक (कारागृह आणि सुधार सेवा) अमिताभ गुप्ता यांच्या मुलाखतीने कल्याण जेलमधील या एफ एम केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी कल्याण जेल अधीक्षक आर. आर. भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी जे.ए. काळे आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कारागृहामध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्यातील कैदी बंदिस्त असतात. कारागृहात येणाऱ्या प्रत्येक कैद्याच्या मनात नेहमी अस्वस्थता असते. आपला परिवार, आपले भविष्य, आपली केस याबाबत नेहमी तणाव असतो. यामुळे त्यांच्य मनात नकारात्मक भावना निर्माण होतात. यापासून थोडासा विरुंगळा म्हणून आणि कैद्यांना सकारात्मकतेकडे नेण्याकरीता कारागृहात FM रेडिओ सेंटर हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली.
या F.M. रेडीओ कक्षामध्ये कारागृहातील बंदी सिध्देश पांचाळ यांनी रेडीओ जॉकीची भुमिका पार पाडली. उद्घाटनप्रसंगी कारागृहातील बंदी पांचळ यांनी अमिताभ गुप्ता यांची रेडीओ F.M. वर मुलाखत घेऊन कारागृह विभागातील सुधारणा आणि सोईसुविधेबाबत चर्चा केली. त्यावेळी अमिताभ गुप्ता कारागृहातील बंद्यांच्या मानवी हक्कांचे उल्लघन होऊ नये हा सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन बंद्यांना नियमानुसार देण्यात आलेल्या व्हीडीओ कॉल, कॉईनबॉक्स, मनिऑर्डर मर्यादेमध्ये करण्यात आलेली वाढ आदींबाबत मार्गदर्शन केले. तसेच कैद्यांच्या पुर्नवसनाकरीता नियमानुसार भविष्यातही विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
कल्याण जेलमध्ये सुरु करण्यात आलेल्या एफ एम रेडीओच्या माध्यमातून कैद्यांच्या आरोग्याकरीता घ्यायच्या काळजीबाबत तज्ञांचे मार्गदर्शन, प्रबोधनात्मक कार्यक्रम, मनोरंजनाकरीता मनपसंद गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर संपुर्ण महाराष्ट्र कारगृह विभागात सुरु संगणकीकरणातंर्गत कल्याण कारागृहामध्ये किऑस्क मशिन बसविण्यात आले आहे. या मशिनच्या माध्यमातून कैद्यांना त्यांच्या केसची पुढील तारीख, त्यांच्या बँक खात्यावरील जमा रक्कम, मुलाखतीबाबतच्या नोंदी आदी माहिती एका क्लीकमध्ये उपलब्ध होणार आहे. या मशीनचेही अमिताभ् गुप्ता यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.
यापूर्वी येरवडा मध्यवर्ती कारागृह, नागपूर मध्यवर्ती कारागृह, अमरावती मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह इत्यादी कारागृहामध्ये FM रेडिओ सेंटर सुरू करण्यात आलेली आहेत. त्यानंतर आता कल्याण जिल्हा कारागृहात हे एफ एम रेडिओ केंद्र सुरू करण्यात आले असून या उपक्रमाचे सामाजिक स्तरातून कौतुक केले जात आहे.