Home ठळक बातम्या ठाणे जिल्ह्यातील सर्व दुकाने – आस्थापनांची नावे मराठीत असणे अनिवार्य’

ठाणे जिल्ह्यातील सर्व दुकाने – आस्थापनांची नावे मराठीत असणे अनिवार्य’

 

ठाणे दि.6 एप्रिल :
ठाणे जिल्ह्यातील सर्व दुकाने आणि व्यापारी आस्थापनांनी आपल्या आस्थापनांच्या नावाचे फलक इतर भाषेबरोबरच मराठी भाषेमध्ये देवनागरी लिपीत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच मद्यविक्री आणि मद्यपान सेवन करणाऱ्या आस्थापनांना कोणत्याही गडकिल्ल्यांची अथवा महापुरुषांची नावे देता येणार नसल्याच्या सूचना ठाणे जिल्हा कामगार उपायुक्त कार्यालयाने दिल्या आहेत.

महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे आणि सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017 च्या कलम 35 अन्वये आस्थापनेच्या नावाचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा फलक प्रदर्शित करणे बंधनकारक असून तो प्रदर्शित करताना मराठी शब्दांचा आकार हा इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. तसेच मद्यविक्री किंवा मद्यपान सेवा देणाऱ्या आस्थापनेला महापुरुषांची किंवा गडकिल्ल्यांची नावे देता येणार नसल्याचेही या अधिनियमात नमूद करण्यात आले आहे. पूर्वी दहापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांसाठी ही तरतूद लागू होती. मात्र आता शासनाने 17 मार्च 2022 रोजी या अधिनियमात सुधारणा करत सर्व आस्थापनांना ही तरतुद लागू केली आहे.

त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनाच्या मालकांनी आपल्या दुकानांची,आस्थापनांची नावे मराठी भाषेत देवनागरी लिपीत प्रदर्शित करावीत. तसेच मद्यविक्री-मद्यसेवा देणाऱ्या आस्थापनांनी महापुरुषांची अथवा गडकिल्ल्यांची नावे देऊ नये, अशा सूचनाही कामगार उपायुक्त कार्यालयाने दिल्या आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा