Home ठळक बातम्या अतिरेकी हल्ल्याविरोधात डोंबिवलीत उद्या सर्वपक्षीय बंदची घोषणा; तिघा डोंबिवलीकरांच्या मृत्यूने नागरिकांमध्ये संतापाची...

अतिरेकी हल्ल्याविरोधात डोंबिवलीत उद्या सर्वपक्षीय बंदची घोषणा; तिघा डोंबिवलीकरांच्या मृत्यूने नागरिकांमध्ये संतापाची लाट

अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी या तिघांवरही शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

डोंबिवली दि.23 एप्रिल :
काश्मिरच्या पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील तीन जणांचा मृत्यू झाला असून या घटनेविरोधात उद्या डोंबिवली बंदची घोषणा करण्यात आली आहे. अतिरेकी हल्ल्यात मरण पावलेल्या अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले या तिघांचे पार्थिव काही वेळापूर्वी डोंबिवलीच्या भागशाळा मैदानात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे यांच्यासह हजारो डोंबिवलिकर भागशाळा मैदानात अंतिम दर्शनासाठी जमले होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत त्यांच्यासमोरच या अतिरेकी हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला. “साहेब हिंदू आहे की मुस्लिम आहे असे विचारून ज्यांनी आमच्या लोकांना मारले त्यांच्यापैकी कोणालाही सोडू नका अशी आर्त विनवणी करतानाच पाकिस्तान मुर्दाबाद, जय श्रीराम , भारत माता की जय अशा विविध प्रकाराच्या संतप्त घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर देण्यात आल्या. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे बोलणे ऐकून घेत आपल्याला जे हवंय तेच होणार अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

भागशाळा मैदानात सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सर्वात आधी हेमंत जोशी, संजय लेले आणि सर्वात शेवटी अतुल मोने यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत आणण्यात आले. त्यावेळी अंत्यदर्शनासाठी उपस्थित असणारे हजारो नागरिक स्तब्ध झाले होते. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये एकीकडे अश्रू होते आणि दुसरीकडे घडलेल्या घटनेबाबत मनामध्ये प्रचंड संताप.

त्यामुळेच तर या तिघांचेही पार्थिव अंत्यदर्शनासाठी नेण्यात येत असताना लोकांमधून पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात होती. तसेच घडलेल्या घटनेचा जोरदार बदला घेऊन जशास तसे उत्तर देण्याची आक्रमक मागणीही यावेळी करण्यात आली.

दरम्यान या तिघांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येत असताना भाजपाचे माजी उपमहापौर राहुल दामले यांनी घडलेल्या घटनेविरोधात उद्या सर्वपक्षीय डोंबिवली बंदची हाक दिली. ज्याला उपस्थित शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

तर रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास या तिघांवरही डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर स्मशानभूमीत अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे अनेक नातेवाईक आणि डोंबिवलीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा