श्रीराम जन्मभूमी आंदोलन आणि श्रीराम मंदिर निर्माणासाठी वेचले आयुष्य
कल्याण दि.१ जून :
अखिल भारत हिंदू महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडीत जोशी यांचे आज दुपारी हृदयविकाराने निधन झाले. मुंबईतील केईएम रूग्णालयात गेल्या २ दिवसांपासून उपचार सुरू होते.
कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या प्रमोद जोशी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवसांपूर्वी मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. करोडो हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान असणाऱ्या अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी आंदोलन आणि श्रीराम मंदिर निर्माणासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले.
अखिल भारत हिंदू महासभेचे प्रवक्ते असणारे प्रमोद जोशी हे सुरुवातीपासूनच श्रीराम जन्मभूमी आंदोलनामध्ये सक्रीय सहभागी होते. श्रीराम जन्मभूमी विषयाअंतर्गत पुरातत्व विभाग आणि त्याच्याशी संबंधित कायदेशीर बाबींमध्ये त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळेच कल्याणपेक्षा त्यांचा अधिक मुक्काम हा अयोध्या आणि दिल्लीमध्ये असायचा. तसेच श्रीराम जन्मभूमीसोबतच श्री काशी विश्वनाथ मंदिरदेखील त्यांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांच्या अशा या अकाली निधनाने शोक आणि हळहळ व्यक्त होत आहे.