कल्याण पश्चिमेत कार्यक्रमासाठी भव्य सभागृह उपलब्ध होणार
कल्याण, दि.३० जानेवारी:
कल्याणमधील गोदरेज हिल रोडवरील माधव सृष्टी येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य आगरी-कोळी-कुणबी समाज सांस्कृतिक भवनाचे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले. सुमारे ७ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या भवनामुळे सुमारे ३५ ते ४० वर्षांपासून स्थानिक नागरिकांची कार्यक्रमासाठी भव्य सभागृह उभारण्याची मागणी पूर्ण होत आहे.
या भवनासाठी कपिल पाटील यांच्या खासदार निधीबरोबरच महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांचा विकास योजनेंतर्गत ७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून कल्याण पश्चिममधील नागरिकांकडून सांस्कृतिक भवनाची मागणी करण्यात येत होती. आज ही मागणी पूर्ण झाल्याचे समाधान वाटत असून, लवकरच सांस्कृतिक भवन पूर्ण होईल.
या वेळी भाजपाचे आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार प्रकाश भोईर, आगरी सेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाणकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, अर्जुन भोईर, सचिन बासरे, वरुण पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, अर्जुन म्हात्रे, आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
कल्याण पश्चिम भागाचा वेगाने विकास होत आहे.
या भागातील आगरी, कोळी, कुणबी समाजबांधवांसह वर्षानुवर्षे स्थायिक असलेल्या साळी, माळी व इतर् सर्व समाजघटकांना कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध होत नव्हती. ते ध्यानात घेऊन भव्य सांस्कृतिक भवनासाठी माझ्या खासदार निधीबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांचा विकास योजनेंतर्गत निधी उपलब्ध झाला, या बद्दल कपिल पाटील यांनी आभार मानले. या सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून विवाह समारंभांबरोबरच बचत गटाच्या महिलांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम, तरुणांसाठी मार्गदर्शन, कामगारांसाठी उपक्रम आदी राबविण्याचाही विचार करावा. या भवनातून समाजाला दिशा मिळाली पाहिजे. त्याचबरोबर सर्व समाजाने एकत्र येण्याबरोबरच सर्वांना सोबत घेऊन कार्य करावे, असे पाटील यांनी सांगितले.
आमदार गणपत गायकवाड यांनी सांस्कृतिक भवनाच्या कामाच्या प्रस्तावाची फाईल अवघ्या ८ दिवसांत मंजूर झाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आभार मानले. तसेच सर्व समाज त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे नमूद केले.
सुभाष मैदानातील संकुलासाठी साडेसात कोटी राज्य सरकारकडे…
कल्याणमधील सुभाष मैदानात १० कोटी रुपये उभारून भव्य क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. त्यात इनडोअर खेळांसह विविध सुविधा खेळाडूंना उपलब्ध होतील. या संकुलासाठी केंद्र सरकारकडून सुमारे साडेसात कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडे पाठविण्यात आलेला आहे. उर्वरित निधीही लवकरच उपलब्ध होईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.