कल्याण दि. ८ मे :
भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांविरोधात दिल्लीत आंदोलन सुरू असताना आता काँग्रेस पक्षाने देशाच्या स्थानिक पातळीवरही हा मुद्दा नेण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण शहर युथ काँग्रेसतर्फे ठिय्या आंदोलन करत खासदार ब्रुजभूषण सिंह यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.
खासदार ब्रुजभूषण सिंह यांच्यावरील कथित आरोपांविरोधात काँग्रेस पक्षाने आता आणखी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिमेतील छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आज सकाळी युवक काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली.
युवक काँग्रेस शहराध्यक्ष जपजीत सिंह आणि प्रदेश सरचिटणीस विरेंद्र चोरघे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात युवा कार्यकर्त्यांनी काळया फीती बांधून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल होऊन चार ते पाच महिने झाले असूनही अद्याप त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? असा सवाल विचारत सिंह यांना तात्काळ अटक करून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी यावेळी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. यावेळी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे शकील खान आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.