कल्याण पश्चिमेच्या फडके मैदानावर रंगणार 9 दिवसांचा सोहळा
कल्याण दि.११ जानेवारी :
गेली दोन वर्षे कोवीडमुळे खंडीत झालेल्या आगरी कोळी मालवणी महोत्सवाच्या दिमाखदार सोहळ्याचे यंदा आयोजन करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारपासून पुढील दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांसह वेगवेगळ्या खाद्य पदार्थांच्या चवीही चाखता येणार असल्याची माहिती आयोजक देवानंद भोईर यांनी दिली.
कल्याण पश्चिमेच्या लालचौकीजवळील वासुदेव बळवंत फडके मैदानावर येत्या शक्रवारपासून हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचा शुभारंभ केला जाणार असल्याचे देवानंद भोईर यांनी सांगितले.
१३ जानेवारी ते २२ जानेवारी असे दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात नृत्यस्पर्धा, खेळ पैठणीचा आदी विविध सांस्कृतिक मेजवानीसह सोशल मीडियावरील फसवणुकीसंदर्भात जनजागृतीपर कार्यक्रम आणि सन्मान वर्दीचा या विशेष कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.
तर या महोत्सवाची खरी लज्जत आणि ओळख असणार आहेत ते आगरी- कोळी आणि मालवणी खाद्यपदार्थांचे वेगवेगळे स्टॉल्स. चवीने खाणाऱ्या खवय्यांना पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या पदार्थांच्या माध्यमातुन आपल्या जिभेचे हवे तितके चोचले पुरवता येणार असल्याचेही भोईर यांनी सांगितले.
कधीपासून : १३ जानेवारी ते २२ जानेवारी २०२३
वेळ : सायंकाळी ५ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत
ठिकाण : वासुदेव बळवंत फडके मैदान, सुभाष नगर, लालचौकीजवळ, कल्याण – पश्चिम