कल्याण दि.16 सप्टेंबर :
राज्यातील महाविकास आघाडीमधील दिग्गज मंत्र्यांनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केडीएमसीकडे आपला मोर्चा वळवला आहे. कोवीड काळात केडीएमसीने केलेल्या घोटाळ्यांची लवकरच आपण काळी पत्रिका काढणार असल्याचे सांगत सोमय्या यांनी केडीएमसीला लक्ष्य केले आहे. भाजप कल्याण जिल्हा कार्यालयात झालेल्या पदाधिकऱ्यांच्या बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील विविध मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच आजच्या कल्याण भाजप पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर किरीट सोमय्यांच्या रडारवर आता केडीएमसी आल्याचे दिसून आले. आज आपण आमदार गणपत गायकवाड, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी आमदार नरेंद्र पवार ,जगन्नाथ पाटील यांच्यासोबत बैठक झाली. त्यामध्ये कोवीड काळात केडीएमसीने केलेल्या कामाची तपासणी करण्याबाबत भाजप आणि तज्ञ मंडळींची समिती बनवणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सोमय्या म्हणाले. तसेच या कामांमध्ये झालेल्या घोटाळ्यांची काळी पत्रिका बनवून किती घोटाळे झाले हे जाहीर करणार असल्याचेही सोमय्या यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे येत्या काळात किरीट सोमय्यांकडून केडीएमसीच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधणार असल्याचे संकेत आजच्या वक्तव्यावरून मिळाले आहेत.