गैरसमजुतीतून मतदानावर बहिष्काराची जिल्हा आयकॉन नीता केणे यांची कबुली
कल्याण पूर्व दि.20 नोव्हेंबर :
142 कल्याण पूर्व मतदारसंघात पोलीस अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या गैरसमजुतीमधून तृतीयपंथी समुदायाने आज विधानसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकला होता. मात्र निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचारी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर गैरसमजुतीतून हा प्रकार घडल्याची प्रांजळ कबुली देत
त्यानंतर तृतीयपंथी मतदारांनी उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून आले.(After the misunderstanding was finally cleared, transgender voters voted spontaneously in Kalyan)
मतदान केंद्रात गाडी घेऊन येण्याच्या मुद्द्यावरून तृतीयपंथी मतदारांच्या जिल्हा आयकॉन नीता केणे यांच्यात आणि पोलिसांमध्ये काहीसा विसंवाद झाला. या विसंवादाचे रूपांतर नंतर गैरसमजामध्ये झाले आणि या गैरसमजातून संपूर्ण तृतीयपंथी मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका जाहीर केली. मात्र निवडणूक अधिकारी, केडीएमसी अधिकारी आणि पोलिस प्रशासनाने हा नाजूक विषय अत्यंत संवेदनशीलपणे हाताळत या सर्वांची समजूत काढली.
तृतीय पंथीय मतदारांची गैरसमजूत दूर करून त्यांना मतदानास प्रवृत्त करण्यासाठी 142- विधानसभा मतदान संघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक अमित शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त ठाणे संजय जाधव, निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ , परिमंडळ- 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी संजय जाधव आणि तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी मोलाची भूमिका बजावली.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे अशोक शिनगारे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड हे देखील याप्रकरणी वेळोवेळी मार्गदर्शन करीत होते.
झालेला प्रकार गैर समजुतीतून – जिल्हा आयकॉन नीता केणे
दरम्यान तृतीयपंथी समुदायाच्या नेत्या जिल्हा आयकॉन नीता केणे यांनी झालेला हा प्रकार गैरसमजुतीतून घडल्याचे स्पष्ट केले. तसेच तृतीयपंथी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. आणि आज सगळ्यांच्या सहकार्यामुळेच आम्हाला मुख्य प्रवाहात आणले जाईल असा आशावाद नीता केणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.