वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे संशयाचा धूर
कल्याण दि. 1 एप्रिल :
कल्याणात कचऱ्याला आग लागण्याच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. कल्याण डंपिंग ग्राउंडला आग लागून काही दिवसही उलटत नाहीत तोच आता कल्याणातील बारावेच्या घनकचरा प्रकल्प केंद्रालाही मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीमध्ये बारावे घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातील कचऱ्यासह या केंद्राचेही मोठे नुकसान झाले आहे. वारंवार लागणाऱ्या या आगीच्या घटनांमुळे संशय निर्माण झाला असून अत्यंत चांगल्या प्रकारे सूरू असणाऱ्या या कामात नेमकं कोण आणि कशासाठी हा मीठाचा खडा टाकत आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कल्याण पश्चिमेच्या बारावे परिसरात रिंगरोडला आणि गांधारी नदीला लागून असणाऱ्या या कचरा प्रकल्पात हा प्रकार घडला. काल मध्यरात्री 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या बारावेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकलपात सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे खत तयार केले जाते. गेल्या काही महिन्यांपासून हे काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरु आहे. मात्र आज याठिकाणी लागलेल्या आगीमध्ये या कचरा प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. पहाटे लागलेली ही आग अद्यापही धुमसत असून अग्निशमन दल त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. तसेच ही आग सध्या नियंत्रणात आल्याची माहितीही मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.
कल्याणच्या डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला आग लागून काही दिवसही उलटले नाहीत. तोच या घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला ही आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली की कोणी लावली याबाबत आत्ता काही सांगणे अवघड असले तरी अवघ्या काही दिवसांच्या फरकाने पुन्हा घडलेल्या या आगीच्या प्रकारामुळे संशयाचा धूर मात्र नक्कीच निघत आहे.