Home ठळक बातम्या दिल्लीनंतर थेट कल्याण डोंबिवलीतच; फिटनेस टेस्टसाठी केडीएमसी अग्निशमन दलाचे अनोखे मॉक ड्रिल

दिल्लीनंतर थेट कल्याण डोंबिवलीतच; फिटनेस टेस्टसाठी केडीएमसी अग्निशमन दलाचे अनोखे मॉक ड्रिल

कल्याण दि.4 एप्रिल :
अग्निशमन दल हे कोणत्याही शहराच्या दृष्टीने अत्यावश्यक घटक असून त्यामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाकडून एक अनोखे असे मॉक ड्रिल घेण्यात आले ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या फिटनेसची खरी कसोटी लागल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपाठोपाठ असा उपक्रम राबविणारी कल्याण डोंबिवली ही पहिली महापालिका ठरली आहे. (After Delhi, directly in Kalyan Dombivali; Unique mock drill of KDMC fire brigade for fitness test)

गेल्या दोन दशकांमध्ये कल्याण डोंबिवली शहरांचे मोठ्या संख्येने नागरीकरण झाले आहे. पूर्वीच्या वाडे, लहान इमारती आणि बैठ्या चाळींची जागा आता उंचच उंच अशा बहुमजली इमारतींनी घेतली असून आकाशाला भिडण्याची मोठी स्पर्धा लागली आहे. मात्र इमारतींच्या या स्पर्धेमध्ये त्यांची सुरक्षा आणि संभाव्य धोक्यांचाही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
कल्याण शहराचा विचार करता गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत बहुमजली इमारतीमध्ये आग लागल्याच्या अनेक घटना घडल्याने उंच इमारती आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या इमारतीमध्ये लागणाऱ्या आगी किंवा संभाव्य आपत्तींसाठी सदैव सज्ज आणि तत्पर असणे हे अग्निशमन दलाचे आद्यकर्तव्य आहे. आणि त्याच विचारातून आपल्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची आज फिटनेस टेस्ट घेण्यात आल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. दिल्लीला गेलो असताना तिकडे अग्निशमन दल कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणारे मॉक ड्रिल वजा फिटनेस टेस्ट आपण पाहिली. आणि त्याच धर्तीवर आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांचीही फिटनेस टेस्ट घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.

कल्याण पश्चिमेच्या शहाड येथील बिर्ला वन्य या बहुमजली संकुलात हे मॉक ड्रिल घेण्यात आले. यामध्ये अग्निशमन कर्मचाऱ्याला वजनदार असा पाण्याचा पाईप (तांत्रिक भाषेत होज) खांद्यावर घेऊन धावत पळत आठव्या मजल्यावर पोहोचण्यासाठी किती वेळ लागला याचे परीक्षण करण्यात आले. आणि विशेष म्हणजे सर्वच कर्मचाऱ्यांनी अतिशय कमी वेळेमध्ये आठव्या मजल्यावर पोहोचत आपले फिटनेस आणि गुणवत्ता सिद्ध केल्याचे दिसून आले. अग्निशमन दलाच्या कल्याण डोंबिवलीतील विविध केंद्रांचे कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. तसेच या उपक्रमामध्ये बिर्ला वन्य रहिवासी संकुलातील सतीश कोठारे आणि त्यांची संपूर्ण टीमही सहभागी झाली होती.

तर हे फिटनेस टेस्ट वजा मॉक ड्रिल पाहून संबंधित इमारतीमधील रहिवाशांनीही समाधान व्यक्त केले. आमच्या सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकारचे मॉक ड्रिल अत्यंत आवश्यक असल्याची प्रतिक्रिया राकेश वाधवा या रहिवाशाने दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा