
कल्याण दि.7 नोव्हेंबर:
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढतीत महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार सचिन बासरे यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भा.क.प.) सक्रीय पाठिंबा जाहीर केला आहे. ठाणे जिल्हा कौन्सिलने आपल्या अधिकृत पत्राद्वारे ही घोषणा केली असून, महाविकास आघाडीच्या विजयासाठी आपले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते संपूर्ण ताकदीने कामाला लागणार असल्याचे त्यात स्पष्ट केले आहे.
भाकपने त्यांच्या पत्रकात नमूद केले आहे की, महाराष्ट्रात लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीचा विजय होणे अत्यावश्यक आहे. या निवडणुकीत घटक पक्ष म्हणून आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कटिबद्धता व्यक्त केली आहे. सचिन दिलीप बासरे यांच्या प्रचारासाठी भाकप ने आपले सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तैनात केले आहेत.
ठाणे जिल्हा सचिव कॉम्रेड आत्माराम विशे, सहसचिव कॉम्रेड उदय चौधरी, महिला फेडरेशन सचिव कॉम्रेड संकल्पना कऱ्हाडे, तसेच कॉम्रेड श्रीकांत कांबळे, कॉम्रेड विलास शेलार यांसारख्या प्रमुख नेत्यांचे सक्रिय योगदान अपेक्षित आहे. पक्षाने दिलेल्या पत्रकानुसार, कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक वाडा आणि वस्तीत कार्यकर्ते मतदारांशी थेट संवाद साधून महाविकास आघाडीच्या कार्याचा प्रचार करतील. विशेषतः कामगार, शेतकरी, महिला आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
भाकपने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यामागील कारण स्पष्ट करताना म्हटले आहे की, सध्याच्या राजकीय वातावरणात संविधानिक मूल्यांचे रक्षण हेच आपले सर्वोच्च ध्येय आहे. त्यामुळे मतदारांनी सचिन बासरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून लोकशाहीला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.