
कल्याण पोलिस परिमंडळ 3 मध्ये राबवण्यात आली शोधमोहीम
कल्याण दि.29 एप्रिल :
कल्याण डोंबिवली शहरांमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या ६ बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. ठाणे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशान्वये परिमंडळ ३ कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात शोध मोहिम राबविण्यात आली.(Action taken against 6 Bangladeshi nationals residing illegally in Kalyan-Dombivli)
यामध्ये कल्याण आणि डोबिवलीतील संशयित व्यक्तींची पोलिसांनी चौकशी केली. या व्यक्तींची आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये त्यातील ६ जण बांगलादेशी नागरिक असल्याचे तसेच अवैधरित्या वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती डी सी पी अतुल झेंडे यांनी दिली.
यामध्ये महात्मा फुले चौक पोलीस ठाणेअंतर्गत १, खडकपाडा पोलीस ठाणेअंतर्गत ०१, बाजारपेठ पोलीस ठाणेअंतर्गत १ आणि टिळकनगर पोलीस ठाणेअंतर्गत १ असे एकुण ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्हयाचा पुढील तपास चालु आहेत. या ६ जणांविरोधात पारपत्र (भारतात प्रवेश) अधिनियम १९२० चे कलम ३,४ विदेशी नागरिक कायदा १९४६ चे कलम १३,१४(अ) (ब) प्रमाणे कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण हद्दीमध्ये जानेवारी २०२५ ते आजपर्यंत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या ३८ बांगलादेशी नागरिकांविरोधात १६ गुन्हे दाखल करण्यात आले असून यापुढेही कल्याण आणि डोबिवली शहरात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवरील ही कारवाई सुरू राहणार असल्याचे डी सी पी अतुल झेंडे यांनी स्पष्ट केले आहे.