25 हजारांचा दंड तात्काळ वसूल
कल्याण दि.१५ जून :
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कोळसेवाडी वाहतूक नियंत्रण उपविभागाकडून मोठ्या फौजफाट्यासह फ्लॅश डिप्लॉयमेंटद्वारे कारवाई करण्यात आली. कल्याण-शिळ महामार्गावर झालेल्या या कारवाईदरम्यान 367 बेजबाबदार चालकांना 4 लाख 15 हजार 900 रूपये इतका दंड ठोठावण्यात आला. त्यापैकी 25 हजार 500 रुपयांचा दंड तात्काळ वसूल करण्यात आला.
म्हणून करण्यात आली ही फ्लॅश डिप्लॉयमेंट कारवाई…
कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी भागांत राहणाऱ्या नोकरदार आणि व्यापाऱ्यांना नवी मुंबई, ठाणे, मुंबई गाठण्यासाठी कल्याण-शिळ महामार्ग हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र या महामार्गावर अनेकदा वाहतूकीची प्रचंड कोंडी होताना दिसून येते. परिणामी वेळ आणि इंधनाचा अपव्यय होतो. या साऱ्याला जबाबदार असणाऱ्या बेशिस्त वाहन चालक या महामार्गावर वाहतूक कोंडीत भर घालत असतात. त्यामुळे या मार्गावर लहान-मोठे अपघातही घडले आहेत. या पार्श्वभूमीवर कोळसेवाडी वाहतूक नियंत्रण उपविभागाचे पोलिस निरीक्षक रविंद्र क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी सकाळी एक तासांचा स्पेशल ड्राईव्ह घेण्यात आला.
यांच्यावर झाली कारवाई…
कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या लोढा- पलावा, काटई चौक, बदलापूर चौक आदी ठिकाणी आज सकाळी फ्लॅश डिप्लॉयमेंट करून मोटार वाहन कायद्यांतर्गत विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली. या कारवाईत विदाऊट हेल्मेट 72, विदाऊट सीटबेल्ट 22, जम्पिंग सिग्नल 90, ब्लॅक फिल्म 6, ट्रिपल सीट 3, फ्रंट सीट 18, विदाऊट लायसन्स 13, विनागणवेश 11, रोड पार्किंग 7, धोकदायक पद्धतीने वाहन चालविणे 2, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे 2, फोनवर बोलणे 4, विदाऊट हेल्मेट 90 आणि इतर 27 अशा एकूण 367 बेजबाबदार वाहन चालकांवर यावेळी कारवाई करण्यात आली.
एक तासांच्या फ्लॅश डीप्लॉयमेंटमध्ये यांचा सहभाग…
एक तासांच्या या स्पेशल ड्राईव्हमध्ये कोळसेवाडी विभागाचे 3 अधिकारी, 10 अंमलदार, 10 ट्रॅफिक वॉर्डन, तसेच डोंबिवली उपविभागाचे 2 अंमलदार व कल्याण उपविभागाचे 2 अंमलदार असे एकूण 3 अधिकारी, 12 अंमलदार, 10 वॉर्डननी सहभाग घेतला होता.
कारवाईसोबत नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृतीही…
विशेष म्हणजे यावेळी विशिष्ट पद्धतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांनी मोटार वाहन नियमांचे पालन करण्याची माहिती देणारे फलक दाखवून जनजागृती केल्याचेही कोळसेवाडी वाहतूक नियंत्रण उपविभागाचे पोलिस निरीक्षक रविंद्र क्षीरसागर यांनी सांगितले.