Home ठळक बातम्या 65 अनधिकृत इमारतींवरील कारवाई ; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष घेणार मुख्यमंत्र्यांची...

65 अनधिकृत इमारतींवरील कारवाई ; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

फसवणूक करणारे मोकाट आणि रहिवाशांना अडचणीत आणल्याचा दीपेश म्हात्रे यांचा आरोप

डोंबिवली दि.16 फेब्रुवारी :
खोटी कागदपत्रे सादर करून बांधण्यात आलेल्या डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींवर हायकोर्टाच्या निर्देशानुसार केडीएमसी प्रशासनाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र या इमारतींमध्ये सुमारे २,५०० ते ३ हजार कुटुंबे राहत असून याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. याप्रकरणी फसवणूक करणारे मोकाट आणि रहिवाशांना अडचणीत आणल्याचे सांगत रस्त्यावर उतरण्याचा इशारा कल्याण जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी दिला आहे. आज डोंबिवलीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (action against 65 unauthorized buildings; Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray will meet the Chief Minister)

फसवणूक करणारे मोकाट आणि रहिवासी मात्र अडचणीत…

या 65 इमारतींमध्ये घरं घेणाऱ्या नागरिकांनी रेरा प्रमाणपत्र तपासून घरे घेतली. त्यासाठी एसबीआय, एचडीएफसीसारख्या प्रतिष्ठित बँकांनी कर्जही दिले. तरीही रहिवाशांना कुठलीही पूर्वसूचना किंवा पर्यायी व्यवस्था करून न देता कारवाईचा निर्णय घेण्यात आल्याचे दिपेश म्हात्रे यांनी सांगितले. तसेच खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या बिल्डर, विकासक, अधिकारी आणि रेरा नोंदणी प्रक्रियेत चुकीचे दाखले देणाऱ्या व्यक्तींवर कोणतीही कारवाई झालेली नसून फसवणूक करणारे मोकाट आणि रहिवासी मात्र अडचणीत आल्याचेही म्हात्रे यावेळी म्हणाले.

 

तातडीने तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचीही भेट घेणार…

तर सध्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांचा काळ असून त्यादरम्यान होणाऱ्या या कारवाईमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्यही धोक्यात आले आहे. परिणामी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे केडीएमसी आयुक्तांची भेट घेऊन या सर्व रहिवाशांसाठी आम्ही न्यायाची मागणी करणार आहोत. तसेच यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचे सांगत प्रशासनाने त्वरित योग्य ती कार्यवाही कारवाई केली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिपेश म्हात्रे यांनी या पत्रकार परिषदेत दिला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा