कल्याण /डोंबिवली दि.8 मार्च :
रात्रीच्या सुमारास रस्त्यावर केल्या जाणाऱ्या औषध फवारणीमूळे बाईकस्वारांचे अपघात होत असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्रीपासून आधी कल्याण मग डोंबिवली परिसरात अग्निशमन दलाच्या गाड्यांमधून ही फवारणी केली जात आहे.
कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनातर्फे पुन्हा एकदा शहरात औषध आणि धूर फवारणी सुरू झाली आहे. तर वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून अग्निशमन दलमार्फत रात्री 10 नंतर शहरामध्ये औषध फवारणी केली जात आहे. शनिवारी रात्री कल्याण पश्चिमेपासून या औषध फवारणीला सुरुवात झाली. काल म्हणजेच रविवारी रात्री डोंबिवली पूर्वेतील मंजुनाथ शाळेसमोर फवारणी सुरू होती. त्यावेळी या रस्त्यावरून जाणाऱ्या काही गाड्या घसरून पडल्याची माहिती अपघात झालेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. कल्याणात राहणारे कपिल पवार हे काल रात्री डोंबिवलीहून बाईकवर कल्याणला परतत होते. त्यावेळी मंजुनाथ विद्यालयासमोर आपली गाडीही घसरून आम्ही तिघेही जण पडल्याची माहिती त्यांनी एलएनएनला दिली. यामध्ये आम्हा तिघांनाही मुका मार लागल्याचे सांगत आपल्या गाडीचा वेगही फार जास्त नसल्याचे पवार म्हणाले.
कल्याण डोंबिवली महापालिका कोरोनविरोधात घेत असलेली खबरदारी नक्कीच योग्य आहे. मात्र रस्त्यावर औषध फवारणी करताना आणखी काळजी घेणे आवश्यक असल्याकडेही पवार यांनी लक्ष वेधले आहे.