कल्याण – डोंबिवली दि.1 सप्टेंबर :
जनआशिर्वाद यात्रा, आंदोलनं किंवा बैठकीनिमित्त कोकणात येणाऱ्यांना कोवीड चाचणी बंधनकारक केली नाही. मात्र गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना टेस्ट सक्तीची करण्यात आली असून ही सक्ती शिथिल करण्याची मागणी ठाणे, दिवा, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर परिसरातील कोकणी बांधवांनी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील या कोकणी बांधवांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोकण प्रवासी महासंघातर्फे यासंदर्भात रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून त्यात ही मागणी करण्यात आली आहे.
कोकण आणि गणेशोत्सवाचे अतूट असे नाते आहे. दरवर्षी गणेशोत्सवानिमित ठाणे जिल्ह्यातील लाखो चाकरमानी सहकुटुंब कोकणाकडे रवाना होतात. मात्र यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट बंधनकारक करण्यात आली असून आयत्या वेळी ही टेस्ट करायला लावणे म्हणजे अन्यायकारक असल्याचे मत कोकण प्रवासी महासंघातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. तसेच याआधी झालेली जनआशिर्वाद यात्रा, आंदोलने आणि विविध बैठकांनिमित्त अनेक जण कोकणात आले, त्यांना ही टेस्ट बंधनकारक का केली नाही असा संतप्त सवालही महासंघातर्फे उपस्थित करण्यात आला आहे.
त्यामुळे शासनाकडून आयत्या वेळी लादण्यात आलेले हे निर्बंध शिथिल करण्याची आणि कोरोना टेस्ट बंधनकारक न करण्याची मागणी कोकण प्रवासी महासंघातर्फे रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात करण्यात आली आहे. त्यावर आता शासनाकडून काय निर्णय घेतला जातो हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.