१५ जून ते ३१ जुलै दरम्यान असणार कालावधी
कल्याण डोंबिवली दि.१९ मे :
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कर थकबाकीदारांसाठी केडीएमसीने पुन्हा एकदा अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्याच्या १५ जूनपासून या योजनेला प्रारंभ होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोवीड काळात आणि त्यानंतर केडीएमसी प्रशासनाने लागू केलेल्या या अभय योजनेला थकबाकीदार आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्या पार्श्वभुमीवर ही योजना पुन्हा लागू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार पुढील महिन्यापासून ही योजना लागू केली जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. दांगडे यांनी दिली.
या योजनेअंतर्गत पाणीपट्टी तसेच मालमत्तेच्या थकबाकीवर आकारण्यात आलेल्या व्याजाच्या रकमेत ७५ टक्के सूट (संपूर्ण थकाबकी एकरकमी भरल्यास) देण्यात येणार आहे. १५ जून ते ३१ जुलै या कालावधीसाठी ही योजना लागू राहील.
दरम्यान केडीएमसी स्थापन झाल्यापासून आतापर्यंत थकीत कराची रक्कम तब्बल १ हजार ८०० कोटी रुपयांच्या घरात आहे. यामध्ये व्यावसायिक मालमत्ता कराची थकबाकी सर्वाधिक आहे. त्यापैकी बरीचशी प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने त्याच्या वसुलीत अडथळा ठरत असल्याचे सांगत या अभय योजनेद्वारे २०० ते २५० कोटींची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा होण्याचा विश्वास आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उपायुक्त अतुल पाटील, महापालिका सचिव संजय जाधव उपस्थित होते.