महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लोकार्पण
कल्याण दि.2 मे :
राज्याच्या आरोग्य व्यवस्थेतील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आता कल्याणातही सुरू झाला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यात एकाच वेळी 317 ठिकाणी या दवाखान्याचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. त्यामध्ये कल्याण पश्चिमेच्या दवाखान्याचाही समावेश आहे.
अशा दवाखान्यांची व्याप्ती आणखी वाढविणार…
गोरगरीब आणि सामान्य जनतेला या विनामुल्य सेवेचा लाभ घेता यावा यासाठी अशा दवाखान्यांची व्याप्ती टप्याटप्याने वाढविणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवलीसाठी आणखी 7 केंद्रं मंजूर…
तर कल्याण डोंबिवली महापालिकेकरीता अशा प्रकारची आणखी 7 आरोग्यवर्धिनी केंद्रं मंजूर करण्यात आली असून टप्याटप्याने ती सुरु केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ .भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी दिली.
असा आहे आपला दवाखाना…
कल्याण पश्चिमेच्या वायले नगर येथील तारांगण इमारतीत हा कल्याण डोंबिवलीतील पहिला
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू झाला आहे. या उप्रकमामार्फत नागरिकांना 30 प्रकारच्या रक्तचाचण्या, औषधे आणि वैद्यकीय सल्ला मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यासोबतच या दवाखान्याच्या माध्यमातून असंसर्गिक रोग नियंत्रण कार्यक्रम, लसीकरण, माता बालसंगोपन आदी कार्यक्रमही राबविण्यात येणार आहेत. तर बाह्यसंस्थेद्वारे रक्त आणि लघवीच्या तपासण्या करण्यात येणार आहे.
अशी असणार या आपला दवाखान्याची वेळ…
विशेष म्हणजे या दवाखान्याची ओपीडी सेवेची वेळ दुपारी 2 ते रात्री 10 अशी असणार आहे. याठिकाणी 1 एमबीबीएस डॉक्टर, स्टाफ नर्ससह 5 जणांचा स्टाफ उपलब्ध असेल. या दवाखान्यात उपचार घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या नियम किंवा अटी नसून कोणीही नागरिक त्याचा लाभ घेता येईल अशी माहिती केडीएमसीच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पान पाटील यांनी एलएनएनशी बोलताना दिली.
या उद्घाटन समारंभाला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटीलही ऑनलाईन प्रणालीद्वारे तर महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, आरोग्य प्रशासन उपायुक्त डॉ.सुधाकर जगताप, महापालिका सचिव संजय जाधव, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश डोईफोडे आणि डॉ. विनोद दौंड यांच्यासह कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, माजी पालिका सदस्य रवी पाटील, सुनील वायले उपस्थित होते.