कल्याणच्या रिडर्स कट्ट्याचा उपक्रम
कल्याण दि.१४ एप्रिल :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जात आहेत. मात्र कल्याणात ज्ञानाचा जागर करीत चिमुकल्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी कार्यरत असलेल्या कल्याणच्या रीडर्स कट्ट्यातर्फे हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचे, विद्वत्तेचे मूर्तिमंत प्रतीक. त्यांच्याकडे थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल ५० हजार पुस्तकांचा अफाट संग्रह. पुस्तक वाचन ही बाबासाहेबांची अतिशय आवडती गोष्ट. नेमका हाच धागा पकडत रीडर्स कट्ट्याचे संस्थापक विशाल कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सामूहिक पुस्तक वाचनाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित उपलब्ध असणारी शेकडो पुस्तकं त्यांनी जमा केली. कल्याण पश्चिमेच्या वायले नगर येथील चौकात असणाऱ्या आंबेडकर व्हिजन संस्थेने त्यांना जागा उपलब्ध करून दिली. ज्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील या पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले.
पुस्तकं वाचण्यात दंग झाली मुलं…
कल्याण परिसरात वंचित समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सजग चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेचाही या उपक्रमात महत्वाचा वाटा राहिला. या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कार्य केल्या जाणाऱ्या मुलांना याठिकाणी आणण्यात आले आणि मग त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तके वाचण्यासाठी देण्यात आली. ही प्रेरणादायी पुस्तकं वाचण्यामध्ये ही चिमुकली मुलं अतिशय तल्लीन झाली होती. अशा प्रकारे या चिमुकल्यांच्या सामुदायिक वाचनातून ज्ञानाचा जागर करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी मानवंदना देण्यात आली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रीडर्स कट्ट्याचे संस्थापक विशाल कदम, आंबेडकर व्हिजन संस्था, सुदेष्णा कदम, वसंत कदम, अनिला खापरे यांच्यासह सजग संस्थेच्या सजिता, अनुजा लिमये आदींनी विशेष मेहनत घेतली.